उमरी चौ. मध्ये बिबट्याचा थरार; ३ तासांच्या ऑपरेशननंतर वनविभागाचा मोठा विजय... मादी बिबट्याला जेरबंद...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा उमरी चौ. (ईसापूर) येथे नहराच्या पायलीत दडून बसलेल्या एका मादी बिबट्याला वनविभागाने तब्बल ३ तासांच्या थरारक मोहिमेनंतर सुरक्षित जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सोमवार, दि. १८ मे रोजी पहाटे ५:४५ वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या नहराच्या पायलीमध्ये बिबट्या असल्याची माहिती पोलीस पाटील प्रफुल सावरबांधे यांनी अड्याळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा, शीघ्र बचाव दल आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या आल्याची माहिती गावात पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून वनविभागाने परिसर तात्काळ नियंत्रणात घेतला. त्यानंतर पायलीची एक बाजू बंद करून दुसऱ्या बाजूला लोखंडी पिंजरा लावण्यात आला. अत्यंत शिताफीने राबविण्यात आलेल्या मोहिमेनंतर अखेर बिबट्याला सुरक्षित पकडण्यात यश आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिसलवार यांनी तपासणी केल्यानंतर ही दीड ते दोन वर्षांची मादी बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर वनविभागाने तिला सुरक्षितपणे जंगलात मुक्त केले.
गेल्या काही दिवसांपासून उमरी चौ. आणि ईसापूर परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या होत्या. पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत वनअधिकाऱ्यांचे आभार मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0