अधिकारी 'व्हॉईस मेल'वर, विद्यार्थी 'अंगणवाडी'च्या छताखाली; सहायतानगर शाळेचा जीवघेणा प्रवास...
लोकन्याय मराठी प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार
जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अनास्थेचा आणि गलथान कारभाराचा फटका सहायतानगर येथील प्राथमिक शाळेच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने जीव मुठीत धरून हे विद्यार्थी गेल्या पाच महिन्यांपासून अंगणवाडीच्या छोट्याशा खोलीत शिक्षण घेत आहेत. मात्र, या गंभीर प्रश्नावर उत्तरे शोधण्यासाठी गेलेल्या पत्रकारांचे फोन चक्क ‘व्हॉईस मेल’वर जात असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सहायतानगर येथील शाळेची इमारत मोडकळीस आली असून ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून ही शाळा रिकामी करण्यात आली, परंतु पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना अंगणवाडीच्या जागेत हलवण्यात आले. पाच महिने उलटूनही नवीन इमारतीचा प्रस्ताव धूळ खात पडल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत अपुऱ्या जागेत आणि सोयीसुविधांशिवाय शिक्षण घ्यावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असताना या विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या गंभीर विषयावर जिल्हा परिषद भंडारा येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी ‘माने मॅडम’ यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी दैनिक लोक वतन व लोकन्याय मराठीचे प्रतिनिधी नितीन वरगंटीवार यांनी गेल्या चार दिवसांपासून सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी शिक्षणाधिकाऱ्यांचा फोन ‘व्हॉईस मेल’वर जात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे पत्रकारांशी संवाद टाळणे आणि विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, हे प्रशासनाचे अपयश दर्शवते.
केवळ प्रशासनच नव्हे, तर स्थानिक लोकप्रतिनिधींचेही या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पाच महिन्यांपासून विद्यार्थी अंगणवाडीत कोंडलेले असताना, कुणीही या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही. "आमच्या मुलांना हक्काची शाळा कधी मिळणार?" असा हतबल सवाल आता येथील पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
आता शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन यावर कोणती ठोस भूमिका घेते आणि विद्यार्थ्यांना हक्काची सुरक्षित इमारत कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0