Encroachment Removal Action || PMRDA च्या ‘उशिरा सुचलेल्या शहाणपणा’मुळे चाकणकरांची कोंडी! ऐन कामाच्या वेळी एकेरी वाहतुकीचा घाट; नियोजनशून्य कारभारावर संताप..!
फेब्रुवारीत कामाचे आदेश, मग सप्टेंबरमध्ये जाग का? उद्योजक व हजारो चाकरमान्यांना वेठीस धरल्याने नागरिकांमधून तीव्र संताप..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका पुन्हा एकदा चाकण औद्योगिक परिसरातील लाखो कामगार, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना बसणार आहे. चाकण व आळंदी परिसरातील ६ महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करताना वाहतुकीचे कोणतेही पूर्वतयारी नियोजन न केल्याने आता PMRDA ला अचानक ‘एकेरी वाहतुकीचा’ (One-Way) घाट घालावा लागला आहे. ५ प्रमुख रस्त्यांवर थेट डिसेंबरअखेरपर्यंत एकेरी वाहतूक लादल्यामुळे आधीच वाहतूक कोंडीने होरपळणाऱ्या चाकण एमआयडीसीत अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि गोंधळ उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
PMRDA च्या कार्यपद्धतीवर उठणारे गंभीर प्रश्न व ताशेरे:
१. सहा महिने PMRDA चे अधिकारी झोपले होते का?
शासकीय पत्रानुसार, या रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश २७ फेब्रुवारी २०२६ रोजीच देण्यात आले होते. जर काम फेब्रुवारीत मंजूर झाले, तर वाहतूक नियमन आणि पर्यायी मार्गांचा आराखडा तयार करण्यासाठी सप्टेंबर महिना का उजाडला? तब्बल सहा ते सात महिने कामाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष का करण्यात आले? आधीच पर्यायी मार्गांची आखणी आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय का साधला गेला नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
२. स्वतःच्या अपयशाचे खापर वाहतूक पोलिसांवर आणि नागरिकांवर?
"रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वर्दळ असल्यामुळे वेगाने काम करण्यास अडथळा येत आहे," अशी अजब कबुली खुद्द PMRDA च्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्रात दिली आहे. चाकण हा आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल हब असून येथे २४ तास अवजड वाहनांची वर्दळ असते, हे सामान्य माणसालाही ठाऊक असताना PMRDA च्या इंजिनिअर्सना कामाचा अंदाज का आला नाही? स्वतःचे ढिसाळ नियोजन लपवण्यासाठी आता घाईघाईत एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव पोलिसांच्या माथी मारला जात असल्याचा आरोप होत आहे.
३. पर्यायी मार्ग सुचवले, पण त्यांची क्षमता तपासली का?
PMRDA ने कागदावर सोयीस्करपणे पर्यायी मार्ग आखून दिले आहेत. मोशी, चिंबळी, कुरुळी, सावरदरी आणि आळंदी बाह्यवळण मार्गाने वाहने वळवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, हे पर्यायी रस्ते आधीच अरुंद, खड्डेमय आणि अतिक्रमणांनी वेढलेले आहेत. मूळ रस्त्यांची वाहतूक या अंतर्गत रस्त्यांवर वळवल्यानंतर तेथील गावांमध्ये होणाऱ्या प्रचंड कोंडीची जबाबदारी PMRDA घेणार का? नागरिकांना रोज कित्येक किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागणार असून यामुळे वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होणार आहे.
४. उद्योग क्षेत्राला कोट्यवधींचा फटका बसण्याची भीती..
चाकण एमआयडीसीमध्ये दररोज ‘जस्ट इन टाईम’ (Just-in-Time) तत्त्वावर हजारो कंटेनर आणि कच्च्या मालाची वाहतूक होते. सप्टेंबर ते डिसेंबर या सणासुदीच्या आणि उत्पादनाच्या मुख्य हंगामात तब्बल ३ ते ४ महिने रस्ते एकेरी केल्यास वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. कामगारांच्या बसेस वेळेवर न पोहोचल्यास कंपन्यांचे उत्पादन ठप्प होऊन उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते. उद्योग क्षेत्राशी कोणतीही पूर्वचर्चा न करता हा निर्णय लादला जात असल्याची खंत उद्योजक व्यक्त करत आहेत.
कागदी घोडे नाचवण्यापेक्षा कामाचा वेग वाढवा!
सहा रस्त्यांचे रुंदीकरण ५.५० मीटरवरून १० मीटर काँक्रेटीकरण करणे अत्यंत आवश्यक असले, तरी हे काम ‘कासवगतीने’ न करता २४ तास युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, दिरंगाई, समन्वयाचा अभाव आणि अनागोंदी कारभार यामुळे PMRDA ने विकासकामांच्या नावाखाली चाकणकरांची ससेहोलपट सुरू केली आहे. आता वाहतूक पोलीस या प्रस्तावाला मंजुरी देतात की PMRDA च्या या नियोजनशून्य कारभाराची झाडाझडती घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0