Robbery Case || १२० सीसीटीव्ही आणि 'डंप डेटा'ने उलगडला थरार! खराबवाडीतील दरोडा प्रकरणी संगमनेरच्या ५ जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडून बेड्या; ११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथे एटीएममधून कंपनीचे पैसे काढून जाणाऱ्या वाहनचालक व कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून आणि मारहाण करून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ ने मुसक्या आवळल्या आहेत! या गुन्ह्यातील संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील ५ आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी, छऱ्याचे पिस्तूल आणि रोख रकमेसह तब्बल ११ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली होती?
दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:५० वाजण्याच्या सुमारास गुडविल कंपनीचे फिर्यादी धीरज यादव आणि पिकअप चालक रामभवन सिंह हे खराबवाडी येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून कंपनीचे १ लाख रुपये काढून पिकअप गाडीने जात होते.

खराबवाडी परिसरातील 'हिंदवी कार सेंटर' समोर येताच एका पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारने त्यांच्या पिकअप गाडीला अचानक आडवे लावले. त्या कारमधील दोन इसम आणि लाल रंगाच्या स्कूटीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी धीरज यादव व चालकाच्या मानेवर पिस्तुलासारखी वस्तू लावून "पैसे दे" अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील १ लाख ८ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), १२६(२), ११५(२), ३(५) सह शस्त्र अधिनियम ३, २५ अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा लागला गुन्ह्याचा छडा : १२० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी..
घटनेनंतर अनोळखी आरोपींचा कोणताही थेट पुरावा घटनास्थळी उपलब्ध नव्हता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पथकाने घटनास्थळापासून आरोपींच्या पसार होण्याच्या मार्गावरील तब्बल १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तसेच संशयितांचे मोबाईल सीडीआर (CDR) आणि घटनास्थळावरील 'डंप डेटा'चे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांना आरोपींची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संगमनेर परिसरात सापळा रचून ५ आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी :
पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून खालील पाच आरोपींना अटक केली आहे (सर्व रा. जांबुत खुर्द, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर): सार्थक पोपट दाते (वय २१ वर्षे), अजित बन्सी पारधी (वय २२ वर्षे), सत्यवान सुनील देवकर (वय १९ वर्षे),हनुमंत भास्कर दाते (वय २७ वर्षे), यश सोमनाथ पवार (वय २० वर्षे)
जप्त केलेला मुद्देमाल :
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार, मोटारसायकल, छऱ्याचे पिस्तूल, मोबाईल आणि २४,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ११,६८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार :
सदरची उल्लेखनीय कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, राजाराम लोणकर, महेश वायबसे, अमोल बोराटे, गणेश महाडीक, संतोष असवले, सचिन मोरे, गणेश सोनटक्के, अंजनराव सोडगीर, रामदास मेरगळ, शेखर खराडे, अमोल वेताळ, अमोल माटे, बाबाराजे मुंढे, दयानंद खेडकर, संदीप सुखदाणे, सचिन नागरे, प्रशांत सोनवणे. तर तांत्रिक विश्लेषण
पोलीस शिपाई त्रिनयन बाळसराफ, नागेश माळी, ननावरे यांनी केले.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
1
Angry
1
Sad
0
Wow
0