Political Drama || ‘रक्ताचे पाट’ वाहण्याची भाषा करणाऱ्यांना बाबाजी काळेंचा सडेतोड धोबीपछाड; चासकमानच्या पाण्यावरून खेडमध्ये राजकीय धुराळा, "पिंपरी-चिंचवडला पळवण्याचा डाव आम्ही जुलैतच उधळला!"

Sep 29, 2026 - 22:31
Sep 29, 2026 - 22:34
 0
Political Drama || ‘रक्ताचे पाट’ वाहण्याची भाषा करणाऱ्यांना बाबाजी काळेंचा सडेतोड धोबीपछाड; चासकमानच्या पाण्यावरून खेडमध्ये राजकीय धुराळा, "पिंपरी-चिंचवडला पळवण्याचा डाव आम्ही जुलैतच उधळला!"

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड(राजगुरूनगर) : चासकमान धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला देण्याच्या प्रस्तावावरून खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात ऐन सणासुदीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच पेटले असून आरोप-प्रत्यारोपांची जोरदार राळ उडाली आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत चासकमानचे ३० टक्के पाणी पिंपरी-चिंचवडला वळवण्याबाबत पत्रव्यवहार व हालचाली सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शेतकरी नेते विनोद टोपे यांनी विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यावर थेट निशाणा साधला होता. "चासकमानचे पाणी पळवण्यामागे विद्यमान आमदारांची १०० टक्के मूकसंमती असून, तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील; पण पाण्याचा थेंबही जाऊ देणार नाही," असा घणाघाती आरोप टोपे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या राजकीय टीकेमुळे तालुक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, आमदार बाबाजी काळे यांनी थेट शासकीय पत्रव्यवहार, विधिमंडळातील नोंदी आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकृत स्पष्टीकरणासह विरोधकांचा हा कांगावा पूर्णपणे उघडा पाडला आहे.

चासकमान धरणाच्या पाण्याबाबत आपली ठोस व कणखर भूमिका मांडताना आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले की, चासकमान धरणातून 'वॉटर स्वॅपिंग'च्या माध्यमातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापराने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचा घाट घातला जात असल्याचे समजताच, त्यांनी २ जुलै २०२६ रोजीच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अधिकृत पत्र पाठवून या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला होता. चासकमान धरण हे खेड तालुक्यासह परिसरातील शेती सिंचन, पिण्याचे पाणी, वेगाने वाढणारी चाकण व आळंदी शहरे आणि चाकण एमआयडीसीच्या औद्योगिक विकासासाठी जीवनवाहिनी आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या, सिंचन योजना आणि पूर्व भागासह शिरूरच्या गावांचा भार लक्षात घेता या धरणातील पाण्यावर अतिरिक्त ताण देणे स्थानिक शेतकऱ्यांवर आणि जनतेवर घोर अन्यायकारक ठरेल, असा इशारा त्यांनी शासनाला आधीच दिला होता. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडचे प्रक्रिया केलेले सांडपाणी चासकमानच्या कालव्यात सोडून ते शेतकऱ्यांना वापरण्यास देणे अत्यंत धोकादायक ठरेल; कारण या कालव्यावर अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून असून गटाराचे पाणी शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा डाव आपण कधीही खपवून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा विभागाचे सचिव संजय डवले यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावण्यात आली. पिंपरी-चिंचवडने स्वतःची धरणे बांधावीत, टाटांचे धरण विकत घ्यावे किंवा कोकणातून पाणी उचलावे; परंतु चासकमानचे शेतीचे पाणी एका थेंबानेही कमी होणार नाही, असा अंतिम निर्णय होऊन हा विषय जुलै महिन्यातच कायमचा निकाली निघाला असल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता फाळके यांनीही स्पष्ट केले आहे.

विनोद टोपे यांनी केलेल्या इतर राजकीय आरोपांचा खरपूस समाचार घेताना आमदार बाबाजी काळे म्हणाले की, "दोन दिवस आमदारांनी ब्र काढला नाही" असे म्हणणाऱ्या विरोधकांनी आधी शासकीय पातळीवर काय घडले याची सत्यता तपासावी; ज्या विषयाचा अंत तीन महिन्यांपूर्वीच झाला आहे, त्यावर आता गळे काढून प्रसिद्धी स्टंट करणे हा केवळ हास्यास्पद प्रकार आहे. रस्त्यांच्या उद्घाटनावरून झालेल्या टिकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, तालुक्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी स्वतःच्या शिफारशीने व पाठपुराव्याने प्रशासकीय मंजुरी मिळवून आणला आहे. अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव असतानाही शासकीय शिष्टाचार (प्रोटोकॉल) मोडून परस्पर भूमिपूजन करण्याचे राजकारण विरोधकांनी केले. विरोधकांना भूतकाळाचा आरसा दाखवताना आमदार काळे यांनी सुनावले की, २०१२-१३ मध्ये भामा आसखेडचे पाणी धडकधडीत कोणाच्या काळात विकले गेले आणि धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडले गेले, याचे आधी आत्मपरीक्षण करावे; आज त्याच प्रकल्पग्रस्तांना हक्काची पर्यायी जमीन मिळवून देण्यासाठी आम्ही मंत्रालय स्तरावर लढा देत आहोत. तसेच, डिंभे धरणाच्या प्रश्नावरून आंबेगावमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची राजकीय कोंडी झाली असल्याने, तिथले वातावरण बिघडल्यामुळे ते खेड तालुक्यात नको तिथे लक्ष घालून इतरांना वादात ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा घणाघातही आमदार काळे यांनी केला. त्यामुळे खेड तालुक्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न आपण केव्हाच सुरक्षित केला असून विरोधकांनी बंद झालेल्या विषयाचे भांडवल करून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असा कडक इशारा आमदार बाबाजी काळे यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

Like Like 8
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी