खेडचा पश्चिम भाग संकटात: मान्सूनपूर्व पावसासह चक्रीवादळाचा भीषण तडाखा; लोकप्रतिनिधींकडून पाहणी व मदतीचा ओघ सुरू..!
आमदार बाबाजी काळे यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(पुणे) : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी गावांना मान्सूनपूर्व पावसासह आलेल्या भीषण चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला आहे. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वेगवान वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व उपजीविकेच्या साधनांचेही अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकप्रतिनिधींकडून पाहणी व तातडीची कार्यवाही
या कठीण परिस्थितीत नागरिकांना आधार देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी टोकावडे येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून बाधित कुटुंबांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी तत्काळ तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या आणि बाधित कुटुंबांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही दिरंगाई न करता मदतकार्य गतीने पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक विठ्ठल वनघरे यांनीही नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन पुनर्वसनाची कार्यवाही गतीने करण्यावर भर दिला आहे.

नुकसानग्रस्तांना मदतीचा हात..
बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाबाजी रामचंद्र काळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. आमदार काळे यांच्यासह स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या समन्वयामुळे मदतकार्य वेगाने सुरू असून, नुकसानग्रस्त बांधवांना दिलासा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
नैसर्गिक संकटाच्या या काळात आपण सर्वांनी नुकसानग्रस्त बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.असे आव्हान वरील लोकप्रतिनिधी यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
1
Love
3
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0