Crime Update || सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाचा दणका: दिघीतील सेंट्रिंग प्लेटा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट-३ कडून भंगार व्यावसायिकासह दोघांना बेड्या..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळंदी : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम साईट्सवरून सेंट्रिंग प्लेटांची चोरी करणाऱ्या टोळीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला आणि चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला बेड्या ठोकल्या असून, दिघी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली २ लाख रुपये किमतीची बजाज रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गु.र.नं. ४२९/२०२६ आणि ४३७/२०२६ या गुन्ह्यांचा गुन्हे शाखा युनिट-३ समांतर तपास करत होते. या गुन्ह्यांची तांत्रिक पडताळणी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार आरोपींची माहिती समोर आली. निष्पन्न संशयितांपैकी एक आरोपी दिघी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून महादेव लक्ष्मण खिल्लारे (वय २८, रा. लिंबा गणेश, ता. जि. बीड) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता चोरीचा माल खरेदी करणारा भंगार व्यावसायिक अशोक नारायण शिरसाठ (वय ४३, रा. बिरदवडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. आंबेजोगाई, जि. बीड) याचे नाव समोर आले, त्यानंतर पोलिसांनी त्यालाही तात्काळ अटक केली.
या गुन्ह्यात अशोक विलास खिल्लारे (रा. लिंबा गणेश, जि. बीड), पवन जगदाळे (रा. माजलगाव, जि. बीड) आणि संदेश तायडे (रा. मोशी, मूळ रा. बीड) हे तीन आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस सध्या त्यांचा कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस हवालदार युवराज बिराजदार, पोलीस हवालदार श्रीधन इचके, पोलीस शिपाई स्वप्निल महाले आणि शशिकांत नांगरे यांनी केली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0