Crime Story || सावधान! 'आरटीओ चलान' एपीके फाईल ठरली २५ लाखांचा सापळा; कुख्यात 'जामतारा' टोळी गजाआड, आळंदी पोलिसांची झारखंडमध्ये धडक कारवाई!

Oct 13, 2026 - 22:19
Oct 13, 2026 - 22:42
 0
Crime Story || सावधान! 'आरटीओ चलान' एपीके फाईल ठरली २५ लाखांचा सापळा; कुख्यात 'जामतारा' टोळी गजाआड, आळंदी पोलिसांची झारखंडमध्ये धडक कारवाई!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

आळंदी : वाहनावरील दंडाचे आरटीओ चलान आल्याचे भासवून व्हॉट्सॲपवर एपीके (APK) फाईल पाठवून मोबाईल हॅक करत बँक खात्यावर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय सायबर भामट्यांच्या मुसक्या आळंदी पोलिसांनी आवळल्या आहेत. सायबर गुन्ह्यांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या झारखंडमधील जामतारा परिसरातून मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या एका ५० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ५० लाख रुपयांची मुदत ठेव (FD) मोडून तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती.

नेमकी घटना काय?

​तक्रारदार ज्येष्ठ नागरिक महिन्द्रा पिकअप वाहन चालवून भाजी मार्केटमध्ये भाजीपाला वाहतुकीचे काम करतात. त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर 'आरटीओ चलान' नावाची एक एपीके फाईल आली होती. आपल्या वाहनावर काही दंड/चलान आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी ती फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड (इन्स्टॉल) केली. फाईल डाऊनलोड होताच त्यांचा मोबाईल अचानक बंद पडला. तंत्रज्ञानाची विशेष माहिती नसल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवसांनंतर मोबाईल सुरू झाल्यावर बँक खात्यातून मोठी रक्कम कपात झाल्याचे मेसेज आले. बँकेत जाऊन तपासणी केली असता, त्यांची ५० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) मोडून त्यातील २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये विविध अनोळखी बँक खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे उघड झाले. पुढील फसवणूक टाळण्यासाठी बँकेने तातडीने त्यांचे खाते होल्ड केले आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

क्रेडिट कार्ड रिन्यूअल ते मोबाईल हॅकिंग: अशी चालायची मोडस ऑपरेंडी..

• ​पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक खात्यांचा मागोवा घेतला असता या गुन्ह्याची धक्कादायक पद्धत समोर आली:

• आरोपी विनोद मंडल हा क्रेडिट कार्डची मुदत संपलेल्या किंवा वेळेत बिल भरू न शकणाऱ्या गरजू क्रेडिट कार्डधारकांचा शोध घ्यायचा. 

• ​'आम्ही तुमचे पेमेंट करून क्रेडिट कार्ड रिन्यू करून देतो आणि मुदत वाढवून देतो', असे सांगून तो त्यांचे क्रेडिट कार्ड मिळवायचा व मुख्य आरोपी विष्णू प्रसाद वर्मा याच्याकडे सोपवायचा.

• वर्मा हा एपीके फाईलद्वारे नागरिकांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील चोरलेली रक्कम या क्रेडिट कार्डांमध्ये वर्ग करायचा आणि काही वेळातच विविध माध्यमांतून ती रक्कम काढून घेत असे.

पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील मुफसील पोलीस ठाणे, गिरीडीह येथून दोघांना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून त्यांना खेड न्यायालयात हजर केले असता, १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून २ मोबाईल, ५ क्रेडिट कार्ड, २ क्रेडिट कार्ड झेरॉक्स, एसबीआय बँक स्टेटमेंट आणि पासवर्ड लिहिलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१) ​विष्णुप्रसाद प्रसादी वर्मा (वय २५ वर्षे, व्यवसाय - शेती, रा. देवपूर, पो. स्टे. पर्वतपुर, ता. अहिल्यापूर, जि. गिरीडीह, झारखंड - मुख्य सूत्रधार), २) ​विनोद एतवारी मंडल (वय ४२ वर्षे, रा. तिलकोडीह, ता. भेलवाघाटी, जि. गिरीडीह, झारखंड - सहआरोपी)

तपासी अधिकारी व अंमलदार (कारवाई करणारे पथक):

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, मपोहेका आरती निकम, पोशी सोळंके, पोशी जगताप, सहाय्यक पोलीस फौजदार राजू जाधव आणि मपोशि अरुणा खंबारे यांनी केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन:

​"कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर आलेल्या संशयास्पद एपीके (.apk) फाईल्स इन्स्टॉल करू नका. तसेच क्रेडिट कार्डची मुदत वाढवून देणे किंवा रिन्यू करण्याच्या आमिषाला बळी पडून आपले क्रेडिट कार्ड अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करू नका; या कार्डांचा वापर सायबर भामटे ऑनलाईन चोरीची रक्कम फिरवण्यासाठी करू शकतात."

— मारुती जगताप, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, पिंपरी-चिंचवड

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी