Crime Story || ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून थरार! आंबेठाण येथून अपहरण झालेल्या इसमाची यवतमाळमधून २४ तासांत सुखरूप सुटका; ८ जण गजाआड..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून एका इसमाचे दुचाकीसह अपहरण करणाऱ्या टोळीचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी यवतमाळ येथून धडक कारवाई करत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली असून या प्रकरणात एकूण ८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटे वस्ती, आंबेठाण येथून तीन रिक्षांमधून आलेल्या टोळक्याने राजेश बाळू चव्हाण यांचे त्यांच्या शाईन मोटारसायकलसह अपहरण केले होते. या प्रकरणी फिर्यादी सुषमा राजेश चव्हाण (वय ३०) यांच्या तक्रारीवरून उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी शिक्रापूर येथून सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तपास पथकाने तातडीने यवतमाळ गाठून उर्वरित आरोपींना जेरबंद केले आणि अपहृत राजेश चव्हाण यांची २४ तासांच्या आत सुरक्षित सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई व्हेन्यू कार, तीन रिक्षा आणि फिर्यादीची शाईन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी अमोल रामराव राठोड (वय २९ वर्षे), सचिन रामराव राठोड (वय २५ वर्षे), निलेश संतोष राठोड (वय २७ वर्षे), शुभम प्रल्हाद जाधव (वय २५ वर्षे), संदिप गुलाब राठोड (वय ४२ वर्षे), इंदल थावरा जाधव (वय ४० वर्षे, सर्व रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), राजू बापुराव चव्हाण (वय ४४ वर्षे, रा. वरुड बेबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) आणि संदिप उदयभान जाधव (वय ३२ वर्षे, रा. नाईकनगर तांडा, ता. हदगाव, जि. संभाजीनगर) या सर्व आठ आरोपींना अटक केली आहे.
सदर कारवाई पोलीस उप-आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सपोफौ यदु आढारी, पोलीस हवालदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, संतोष काळे, तानाजी गाडे तसेच पोलीस शिपाई बापुराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभारे आणि समीर महात या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करीत आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
2
Love
0
Funny
0
Angry
2
Sad
0
Wow
1