Power Supply Issue || बिल वसुलीत वाघ, सेवेत मात्र ठणठणपाळ! खराबवाडीत सलग २४ तास 'बत्ती गुल'; महावितरण-महापारेषणच्या मग्रुरीविरोधात जनआक्रोश..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: उद्योग आणि नागरी वस्तीने गजबजलेल्या खराबवाडी व परिसराला महावितरण आणि महापारेषणच्या बेजबाबदार कारभारामुळे अंधाराचा मोठा विळखा पडला आहे. काल पहाटेपासून गेलेली वीज सलग २४ तास उलटूनही पूर्ववत न झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, जनमानसात तीव्र संताप उसळला आहे. वीज पुरवठ्याबाबत जाब विचारण्यासाठी संपर्क साधला असता, महावितरण 'महापारेषण'कडे बोट दाखवते, तर महापारेषण हात वर करते; अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार टोलवाटोलवीमुळे "दोघांच्या भांडणात, नागरिक उघड्यावर" अशी संतप्त स्थिती निर्माण झाली आहे.
लो-व्होल्टेजमुळे घरगुती उपकरणांना धोका..
२४ तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गावातील काही मोजक्या भागात वीजपुरवठा सुरू झाला खरा, परंतु तो इतक्या कमी दाबाने (लो-व्होल्टेज) आहे की फ्रीज, टीव्ही, वॉटर प्युरिफायर यांसारखी महागडी घरगुती उपकरणे जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून विजेचा हा लपंडाव राजरोस सुरू असूनही दोन्ही वीज कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत.
बिल वसुलीत दादागिरी, सेवेत मात्र लाचारी!
सर्वसामान्य ग्राहकाने एका दिवसाचा वीजबिल भरण्यास उशीर केला, तरी तत्परतेने वीज जोडणी तोडणारे महावितरणचे कर्मचारी स्वतःच्या सेवेतील त्रुटींवर मात्र मूग गिळून गप्प का, असा परखड सवाल नागरिक विचारत आहेत. बिल भरल्यानंतर दोन-दोन दिवस ग्राहकांना वीज जोडणीसाठी चकरा मारायला लावणाऱ्या या कंपन्या स्वतःच्या २४ तासांच्या अक्षम्य दिरंगाईची काय भरपाई देणार? हा दुटप्पीपणा आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे.
मंत्र्यांसमोर पोकळ आश्वासने; कृती शून्य!
चाकण-खराबवाडी हा महत्त्वाचा औद्योगिक पट्टा असल्याने येथे वीज खंडित होणे हे उद्योग आणि नागरिकांचे मोठे नुकसान करणारे ठरते. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यादरम्यान या भागातील विजेच्या खेळखंडोब्यावरून दोन्ही कंपन्यांची मंत्र्यांसमोरच अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. त्यावेळी वीज कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणांची पोकळ आश्वासने दिली होती. मात्र, मंत्र्यांची पाठ वळताच परिस्थिती जैसे थे झाली असून अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत.
कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन अटळ..
वेळेवर बिले भरूनही नागरिकांना अशा प्रकारे अंधारात खितपत ठेवणाऱ्या आणि उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. महावितरण आणि महापारेषणच्या ढिसाळ कारभारात सर्वसामान्यांची होणारी ही मानसिक व आर्थिक पिळवणूक त्वरित थांबली नाही, तर संतप्त नागरिक वीज कार्यालयांवर धडक देऊन तीव्र संघर्ष उभारतील, असा थेट इशारा खराबवाडी परिसरातील त्रस्त नागरिकांनी दिला आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0