आंदोलन || "प्रश्नाविना नाही, आता थेट उपोषणाचा पवित्रा! चाकण-महाळुंगे MIDC च्या वाहतूक कोंडीविरोधात पै. गणेश बोत्रे आक्रमक; दोन दिवसीय साखळी उपोषणाचा दणका!"
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: चाकण औद्योगिक वसाहतीतील (MIDC) वाढती वाहतूक कोंडी आणि त्यामुळे नित्यनेमाने त्रस्त होणारे नागरिक, कामगार, उद्योजक व वाहनचालक यांच्या दुरवस्थेविरोधात नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा बांधकाम समितीचे जिल्हा परिषद सदस्य पै. गणेश कांताराम बोत्रे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. या गंभीर समस्येवर तात्काळ ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी आता थेट एल्गार पुकारत दोन दिवसीय साखळी उपोषणाची हाक दिली आहे.

काय आहे आंदोलनाची पार्श्वभूमी?
चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरात दररोज लागणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीमुळे हजारो कामगार, स्थानिक नागरिक आणि वाहनचालक तासनतास अडकून पडतात. यामुळे वेळेचे नुकसान तर होतेच, शिवाय मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. या उद्योजक नगरीतील सर्वसामान्य कामगार ते उद्योजक अशा प्रत्येक घटकाला भेडसावणाऱ्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत पै. गणेश बोत्रे यांनी याविरुद्ध एक पाऊल पुढे टाकत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
कसे असणार उपोषण...
• आंदोलनाचा प्रकार: साखळी उपोषण..
• कालावधी: दिनांक १८/०८/२०२६ ते १९/०८/२०२६
• वेळ: सकाळी १०:०० वाजल्यापासून..
• उपोषण स्थळ: एच.पी. चौक, चाकण-महाळुंगे एमआयडीसी, ता. खेड, जि. पुणे.
"प्रश्न उद्योग नगरीचा, प्रश्न सर्व घटकांचा..."
"हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका घटकाचा प्रश्न नसून, आपल्या सगळ्यांच्या हक्काचा आणि दैनंदिन अस्तित्वाचा प्रश्न आहे. चाकण-महाळुंगे MIDC परिसर वाहतूकमुक्त करण्यासाठी आता सर्वांनी मिळून पुढाकार घेण्याची वेळ आली आहे," असे आवाहन पै. गणेश बोत्रे यांनी केले आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या दोन दिवसीय साखळी उपोषणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
What's Your Reaction?
Like
8
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0