Crime Update || येलवाडीत शेतीच्या वादातून रक्तरंजित राडा: ट्रॅक्टरने रोटाव्हेटर फिरवण्यावरून कोयता अन् बांबूने तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल, दोघांना अटक!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
येलवाडी(ता. खेड) : खेड तालुक्यातील येलवाडी गावच्या हद्दीत जमीन गट क्रमांक १६२ मधील शेतात ट्रॅक्टरने रोटाव्हेटर फिरवण्याच्या कारणावरून दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या संघर्षात एका बाजूने डोक्यात ऊस तोडण्याचा कोयता मारून गंभीर दुखापत करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूने लाकडी दांडके व बांबूने मारहाण करून महिलांनाही जखमी करण्यात आले. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या प्रमुख आरोपींना अटक केली आहे. ही घटना बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० ते ४:२० च्या सुमारास घडली.
या घटनेबाबत पहिल्या बाजूने सागर रामदास नाईकरे (वय ३२, रा. येलवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर नाईकरे हे गट क्रमांक १६२ मधील शेतात ट्रॅक्टरने रोटाव्हेटरचे काम करत असताना अंकुश आनंता गाडे (वय ५३), संजय शंकर गाडे, अक्षय अंकुश गाडे आणि दोन महिला आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून तिथे प्रवेश केला. "ही जमीन तू करू नको, ही जमीन मला शंकर गाडे यांनी वाट्याने करण्यास दिली आहे," असे म्हणून अंकुश गाडे याने फिर्यादीच्या अंगावर धावून जाऊन मारहाण व शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी वाद सोडवण्यासाठी फिर्यादीचे भाऊ अंकुश नाईकरे आले असता, त्यांच्या डोक्यात ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले, तसेच फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेसह आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून मुख्य आरोपी अंकुश आनंता गाडे याला अटक केली आहे.
दुसऱ्या बाजूने आयुष अंकुश गाडे (वय २२, रा. येलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते अर्धलीने कसत असलेल्या शेतजमिनीत सागर रामदास नाईकरे, अंकुश रामदास नाईकरे, योगेश विश्वास गाडे आणि संभाजी गोविंद गाडे हे ट्रॅक्टर घेऊन आले आणि रोटर फिरवून पिकाचे नुकसान करू लागले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना काठ्यांनी पाठीवर, गुडघ्यावर व चेहऱ्यावर मारहाण केली, तर संभाजी गाडे याने शिवीगाळ केली. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची आई भारती गाडे व भाऊ अक्षय गाडे गेले असता, आरोपींनी बांबूने आईच्या कमरेवर, पाठीवर, दोन्ही हातांवर तसेच भावाच्या हातावर जोरदार प्रहार करून दुखापत केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सागर रामदास नाईकरे याला अटक केली आहे.
भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित संघर्षामुळे येलवाडी परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोगले करत आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
0