Political Drama || "आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम!" : ७२ प्रतिनिधींचा मोहिते पाटलांना शब्द; निमगावच्या खंडोबा चरणी घेणार एकजुटीचा कौल.!
पंचतारांकित हॉटेलमध्ये नवनिर्वाचित प्रतिनिधींचा फेटे बांधून जंगी सत्कार; निमगाव खंडोबाच्या साक्षीने देणार एकमुखाने विश्वास; विरोधकांकडे अवघे ३१ प्रतिनिधी राहिल्याने निवडणुकीत चुरस संपल्याची चर्चा!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यापूर्वीच खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांवर मात करत सहकार क्षेत्रातील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. तालुक्यातील तब्बल ७२ मतदार प्रतिनिधींचे भक्कम पाठबळ सोबत घेऊन मोहिते पाटील यांनी निवडणुकीत जोरदार षड्डू ठोकले आहेत. "खेड तालुक्यातून मीच पुन्हा जिल्हा बँकेवर जाणार," असा ठाम आणि निर्विवाद विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, प्रतिनिधींच्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे त्यांच्या विजयावर आतापासूनच शिक्कामोर्तब होत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये सत्कार अन् एकजुटीचा शब्द..
पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खेड तालुक्यातील विविध सहकारी संस्थांमधून नव्याने निवडून आलेल्या सर्व मतदार प्रतिनिधींचा भव्य सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या सोहळ्यात तालुक्यातील ७२ मतदार प्रतिनिधींनी पारंपरिक फेटे परिधान करून उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित सर्व प्रतिनिधींनी "आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्याच बरोबर आहोत," असा ठाम शब्द माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना दिला. प्रतिनिधींच्या या एकमुखी पाठिंब्यामुळे सभागृहातील वातावरण पूर्णपणे मोहिते पाटील यांच्या बाजूने भारून गेले होते.

निमगावच्या खंडोबा चरणी घेणार एकजुटीची शपथ..
दिलीप मोहिते पाटील यांच्या पाठीशी केवळ तोंडी पाठिंबा न ठेवता, सर्व ७२ मतदार प्रतिनिधी निमगाव येथील कुलदैवत श्री खंडोबाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. देवाच्या चरणी जाऊन एकमुखाने मोहिते पाटील यांच्यासोबत निष्ठा व विश्वासाची साक्ष देण्याचा संकल्प या प्रतिनिधींनी केला आहे. या धार्मिक आणि राजकीय पावित्र्यामुळे मोहिते पाटलांची ताकद अधिकच अभेद्य झाली असून, विरोधकांचे सर्व मनसुबे उधळले गेले आहेत.
विरोधक बॅकफूटवर; काळे यांची राजकीय जादू फिकी...
तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र येऊनही त्यांच्याकडे जेमतेम ३१ मतदार प्रतिनिधी शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ७२ विरुद्ध ३१ अशा प्रचंड फरकामुळे विरोधक अक्षरशः बॅकफूटवर फेकले गेले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांनी प्रभाव दाखवला असला, तरी जिल्हा बँकेच्या या महत्त्वाच्या रणांगणात मात्र विद्यमान आमदार बाबाजी काळे यांना आपली राजकीय जादू दाखवता आली नाही, अशीच उघड चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अजून तीन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे. एवढा मोठा कालावधी समोर असताना आता विरोधक कोणती नवी राजकीय समीकरणे जुळवून आणतात, की ७२ प्रतिनिधींचा हा भक्कम आकडा आणि खंडोबा चरणी होणारा कौल पाहून थेट माघार घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीचा मार्ग अत्यंत सुकर झाल्याचे मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
8
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0