राजकीय || स्वकीयांची पाठ, विरोधकांची मांदियाळी! गणेश बोत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड तालुक्याच्या राजकारणात बदलाची चर्चा.?
राजकीय चर्चाना उधाण, बोत्रे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण(खेड) : खेड तालुक्याच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच राजकीय घडामोडीची जोरदार चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या स्वपक्षातील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश पदाधिकारी व सदस्य अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. याउलट, विरोधी पक्षांतील नेत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून शुभेच्छा दिल्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कार्यक्रमाला विरोधकांची मोठी उपस्थिती...
येलवाडी येथे झालेल्या गणेश बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. यामध्ये उबाठा पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते विजय शिंदे पाटील, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, बाजार समितीचे उपसभापती रणजित गाडे पाटील, पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले, तसेच जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे, तनुजा घनवट, उपतालुकप्रमुख संजय घनवट, सयाजी मोहिते, जयसिंग भोगाडे आदींसह अनेक नेते उपस्थित होते.
याशिवाय पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती दिपाली हुळवळे, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, भाजपचे जिल्हा परिषद गटनेते शिवाजी बुचुडे आणि शांताराम इंगवले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय..
एका बाजूला विरोधी पक्षांच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी मांदियाळी जमलेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खेड तालुक्यातील बहुतांश पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पक्षाचे इतर पदाधिकारी कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मात्र कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. तसेच पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे आणि कैलास लिंभोरे उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची पाठ फिरल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेत्यांच्या विधानांनी वेधले लक्ष...
कार्यक्रमात खेड पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांनी आपल्या मनोगतात, भविष्यात जर तालुक्याचे विभाजन होऊन दोन मतदारसंघ झाले, तर गणेश बोत्रे यांना आपण पक्षविरहित सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

तर दुसरीकडे, जिल्हा परिषद सदस्य विजय शिंदे पाटील यांच्या सूचक विधानामुळे राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिंदे यांनी, "तालुक्याचे विभाजन झाले तर गणेश बोत्रे यांना मोठी संधी आहे," असा टोला लगावत राजकीय भविष्याची दिशा स्पष्ट केली. तसेच, गणेश बोत्रे पाटील आणि रणजित गाडे पाटील यांचा उल्लेख करत, "यातील एक हंस आमच्याकडे आला आहे, तर दुसराही लवकरच येईल," असे विधान केल्याने आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी मोठे राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोत्रे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन करताना उपसभापती रणजित गाडे यांनी गणेश बोत्रे यांच्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावाचे कौतुक करतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल खंतही व्यक्त केली. वाढदिवसाच्या या निमित्ताने घडलेल्या या सर्व घटनांमुळे खेड तालुक्याच्या आगामी राजकारणात नेमकी कोणती नवी समीकरणे जुळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0