Accident Story || आमची निष्पाप लेक परत येणार नाही, पण तिच्या मारेकऱ्याला सोडणार नाही!"; दहा दिवसांनंतरही आरोपी मोकाट असल्याने अश्रूंचा बांध फुटला, आदिती राळेच्या न्यायासाठी कुरकुंडीत संतप्त 'रास्ता रोको'
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
कुरकुंडी(ता. खेड) : घराचे अंगण ज्या चिमुरडीच्या हास्याने आणि पावलांनी गजबजून जायचे, ती कु. आदिती राळे अचानक एका क्षणात कायमची निघून गेली. अपघाताच्या नावाखाली एका उमलत्या कळीचा जीवनप्रवास असा क्रूरपणे संपला की, त्या दुःखाने केवळ तिचे आई-वडीलच नव्हे, तर संपूर्ण गाव आजही सुन्न आहे. काळजाचा तुकडा गमावून दहा दिवस उलटले, डोळ्यांतील अश्रू सुकले, पण प्रशासनाच्या निगरगट्ट कारभारामुळे न्यायाची प्रतीक्षा मात्र संपलेली नाही. शेवटी पोटच्या गोळ्याला न्याय मिळवून देण्यासाठी रडणारे डोळे आणि संतापाने पेटलेले हात आज रस्त्यावर उतरले आणि कुरकुंडीत पीडित कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी आक्रमक ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

दहा दिवस उलटले, तरी मारेकरी मोकाट का?
दहा दिवसांपूर्वी झालेल्या या भीषण अपघातात आदितीचा करुण अंत झाला. अपघात घडवून निष्पाप जीवाचा बळी घेणारा आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तपास निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचा थेट आरोप संतप्त कुटुंबीयांनी केला. अपघाताच्या वेळी वाहनाचे टायर पंक्चर नव्हते, असा स्पष्ट मुद्दा समोर आणत कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. "तपास नेमका कोणाला वाचवण्यासाठी भरकटवला जातोय?" असा आर्त आणि तितकाच संतप्त सवाल यावेळी लेक गमावलेल्या पित्याने उपस्थित केला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.
लेकीच्या न्यायासाठी गाव एकवटले; रस्ता रोकोने परिसर दणाणला...
आपल्याच गावच्या एका निष्पाप लेकीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध कुरकुंडीतील प्रत्येक जण स्वतःच्या घरातील लेकीसाठी उभा असल्यासारखा रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आदितीच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, विजय शिंदे, सुनेत्रा बुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, सभापती अशोक राक्षे, जिल्हाध्यक्ष निलेश थिगळे यांच्यासह स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि शेकडो ग्रामस्थ एकमुखाने रस्त्यावर ठिय्या मांडून बसले.

दोन दिवसांचा अल्टीमेटम; लढाई थांबणार नाही!
आंदोलनाची तीव्रता आणि ग्रामस्थांचा संताप पाहून अखेर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस अधीक्षकांमार्फत आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून येत्या दोन दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले, तरी संताप शांत झालेला नाही.
"आमची आदिती आता कधीच परत येणार नाही, पण तिच्या मारेकऱ्याला गजाआड करून कठोर शिक्षा होईपर्यंत आणि तिच्या आत्म्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा घराघरांत सुरूच राहील," असा निर्धार यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0