Fraud Case || ‘कोट्यवधींच्या थापा, बोगस आश्वासने आणि फसवणूक!’: ‘साईजी मल्टीकॉन’च्या मुळूक पिता-पुत्रांची पोलखोल; राजगुरूनगर तहसीलसमोर दातखिळे कुटुंबीयांचे धरणे आंदोलन..!
कंपनीचे चेअरमन संजय मुळूक व एमडी अभिजित मुळूक यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी; पुरावे थेट एसपींना देण्याचा दिला इशारा
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
राजगुरूनगर (खेड) : मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावे सांगून, स्वतःच्या ऐश्वर्याचे खोटे दाखले देऊन आणि अल्पावधीत करोडपती बनविण्याची आमिषे दाखवून नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ‘साईजी मल्टीकॉन’ कंपनीचे चेअरमन संजय बबन मुळूक व एमडी अभिजित संजय मुळूक (दोघे रा. चास, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर करण्यात आला आहे. मुळूक पिता-पुत्रांच्या मनमानी कारभाराला आणि आश्वासनांच्या फसवणुकीला कंटाळून कंपनीचे ट्रेनर संदीप दशरथ दातखिळे यांनी पत्नी सोनाली, वृद्ध आई-वडील आणि दोन लहान मुलांसह आज राजगुरूनगर येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे खेड तालुक्यासह नेटवर्किंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून मुळूक पिता-पुत्रांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तीनही कंपन्यांची सखोल चौकशी करा!
आंदोलक संदीप दातखिळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मुळूक आणि अभिजित मुळूक यांनी ‘साईजी मल्टीकॉन’च्या माध्यमातून एमएलएम (MLM) नेटवर्क मार्केटिंगचे जाळे पसरवले. या नेटवर्कमधून सर्वसामान्य लोकांकडून जमा झालेला कोट्यवधींचा निधी हा स्वतःच्या ‘अभी डेव्हलपर्स’ आणि ‘अभी रिअल्टर्स’ या बांधकाम व रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये वळवला जात असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. या तिन्ही कंपन्यांमधील आर्थिक उलाढाली संशयास्पद असून सर्वसामान्य गुंतवणूकदार व नेटवर्किंग करणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी या तिन्ही कंपन्यांची सखोल चौकशी करून मुळूक पिता-पुत्रांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी दातखिळे कुटुंबीयांनी केली आहे.
बीएमडब्ल्यू, आयुक्त मामा आणि १५० एकर जमीन; झूम मीटिंगमधील बढाया!
कंपनीचे चेअरमन संजय मुळूक हे झूम मिटिंग्स आणि सेमिनारच्या माध्यमातून नेटवर्कर व सर्वसामान्यांना भुलवण्यासाठी स्वतःच्या कथित संपत्तीच्या खोट्या बढाया मारत असल्याचा पर्दाफाश आंदोलकांनी केला आहे.
• “माझी कर्जत येथे १५० एकर जमीन आहे.”
• “एक ते दोन कोटींचे फ्लॅट्स आणि रो-हाउसेसची २०० पेक्षा जास्त बांधकामे सुरू आहेत.”
• “माझे ८ ते १० आयएएस/आयपीएस अधिकारी मित्र आहेत, जे माझीच बीएमडब्ल्यू (BMW) गाडी वापरतात.”
• “माझे सख्खे मामा आयुक्त आहेत, त्यामुळे मला कोणाची भीती नाही.”
• “मी नेटवर्क मार्केटिंगमधून ५५ ते ६० कोटी रुपये कमावले आहेत, तुम्हीही माझ्यासोबत कोट्यवधी कमवाल.”
अशी प्रलोभने दाखवून संजय मुळूक यांनी तरुणांना व नेटवर्किंग करणाऱ्यांना जाळ्यात ओढल्याचा आरोप संदीप दातखिळे यांनी केला आहे.

टार्गेट पूर्ण करूनही हक्काच्या गाडीला नकार; मुळूक पिता-पुत्रांची टाळाटाळ..
२०२३ पासून सुरू झालेल्या ‘साईजी मल्टीकॉन’ कंपनीत आजवर एकाही सदस्याला ठरवून दिलेली ‘फुल पेड कार’ अचिव्ह करता आलेली नव्हती. मार्च २०२६ पासून कंपनीत अहोरात्र काम करणारे ट्रेनर संदीप दातखिळे यांनी पहिल्या ५०० जोड्यांचे (Pairs) अवघड टार्गेट पूर्ण करत कंपनीला तब्बल १५ ते २० लाख रुपयांचा व्यवसाय मिळवून दिला. नियमानुसार दातखिळे हे कंपनीची पहिली कार अचिव्ह करणारे लीडर ठरले. मात्र, एवढा मोठा व्यवसाय पदरात पाडून घेतल्यानंतर चेअरमन संजय मुळूक आणि एमडी अभिजित मुळूक यांनी त्यांना हक्काची कार देण्यास स्पष्ट टाळाटाळ सुरू केली. व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण करूनही केवळ फसवणूक आणि मानसिक छळ वाट्याला आल्याने अखेर दातखिळे कुटुंबीयांना आपल्या लहान मुलांसह रस्त्यावर उतरून उपोषण व धरणे आंदोलन करण्याची वेळ आली.
गुन्हे दाखल न झाल्यास थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पुरावे देणार!
या संपूर्ण प्रकरणाबाबत राजगुरूनगर पोलीस ठाण्यात संजय मुळूक व अभिजित मुळूक यांच्या विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला असून ‘साईजी मल्टीकॉन’, ‘अभी डेव्हलपर्स’ आणि ‘अभी रिअल्टर्स’ या तीनही कंपन्यांची चौकशी करून दोघांवर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांनी जर मुळूक पिता-पुत्रांवर वेळेत कठोर कायदेशीर कारवाई केली नाही, तर साईजी कंपनीच्या अवॉर्ड-रिवॉर्डशी संबंधित सर्व कागदपत्रे, अंतर्गत व्यवहारांचे पुरावे आणि मुळूक यांच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग पेन ड्राइव्हसह थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे (SP Office) सादर करून गुन्हा दाखल करवून घेणार असल्याचा निर्वाणीचा इशारा ट्रेनर संदीप दातखिळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0