Political Controversy || निवडणुकीला तहान-भूक विसरणारे पुढारी, आता गावकऱ्यांच्या संकटावर मात्र 'मुकदर्शक'? खराबवाडीच्या हतबलतेला वाली कोण?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या खराबवाडी गावात सध्या प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायराण जमिनीवरील व्यावसायिक मिळकती जमीनदोस्त झाल्यानंतर, आता प्रशासनाने १ ऑक्टोबर २०२६ नंतर घरे बांधलेल्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. परिणामी, तब्बल १८४ गरीब कुटुंबे सध्या अक्षरशः भयभीत झाली आहेत. मात्र, या भीषण संकटात गावावर आलेली ही धडक पाहताना, ज्या गावपुढाऱ्यांनी इथून मागे ज्या-ज्या निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागण्यासाठी रात्रंदिवस एक केला होता, तेच नेते आज तोंडावर कुलूप लावून गप्प बसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमका प्रकार?
खराबवाडी गावातील गायराण क्षेत्रावर सुमारे ५० ते ६० वर्षांपासून १८४ हून अधिक कुटुंबे वास्तव्य करत आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महसूल प्रशासनाने व्यावसायिक बांधकामांवर कारवाई केली, आणि आता १ ऑक्टोबर २०२६ नंतरच्या रहिवासी घरांवरही बुलडोझर चालवण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, हक्काची घरे उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. अशा बिकट प्रसंगी या नागरिकांना धीर देणे आणि प्रशासनासमोर त्यांची बाजू भक्कमपणे मांडणे ही स्थानिक गाव पुढारी यांची नैतिक जबाबदारी होती. पण कुठे तरी यात गावपुढारी पळ काढताना दिसत आहेत.
पुढाऱ्यांची दुतोंडी आणि स्वार्थी राजकारण..
ग्रामपंचायत असो वा विधानसभा, निवडणुकीची चाहूल लागताच हेच गावपुढारी तहान-भूक विसरून गुप्त बैठका आणि राजकीय बेरजेचे राजकारण करण्यात पटाईत असतात. त्यावेळी प्रत्येकाचा आवाज मोठा असतो आणि विकासाची आश्वासने दिली जातात. परंतु, आज जेव्हा याच गावातील हतबल नागरिक रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे, तेव्हा मात्र हेच नेते गायब झाल्याचे चित्र आहे. "केवळ निवडणुकीपुरते पाहुणे" असल्याची प्रचिती या संकटकाळात गावकऱ्यांना आली असून, नेत्यांची ही चुप्पी त्यांच्या दुतोंडी आणि स्वार्थी स्वभावाची पोलखोल करत आहे.
ग्रामस्थांचा संताप आणि जिवंत वास्तव..
आपल्या राजकीय हेवेदावे आणि एकमेकांची जिरवाजिर्वीच्या राजकारणात हे पुढारी गरीब नागरिकांच्या पोटावर पाय आणत असल्याची भावना संतप्त ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. संकट काळात जो पाठीशी उभा राहतो, भविष्यात जनताही त्याच नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा स्पष्ट संदेश आता गावकऱ्यांनी दिला आहे. या कारवाईला कुठे तरी राजकीय किनार तर नाही ना असाही प्रश्न गावातील बाधित ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
गावाचे खरे गावपण टिकवायचे असेल तर राजकीय विषमता बाजूला सारून एकमेकांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. परंतु, केवळ मतांच्या राजकारणासाठी सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना मूग गिळून बसणाऱ्या अशा स्वार्थी पुढाऱ्यांचा बुरखा आता खराबवाडीतील जागरूक जनतेने फाडून काढला असून, "गरिबांचे नुकसान करणाऱ्यांना काळ कधीच माफ करणार नाही," असा संतप्त इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
1
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0