राजकीय : खराबवाडी ग्रामपंचायतीला पुन्हा 'ग्रहणा'ची साक्ष? वाघजाईनगरच्या वेगळेपणामुळे निवडणुकीचा चेंडू पुन्हा हवेत?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असतानाच, आता पुन्हा एकदा प्रशासकीय निर्णयाने निवडणुकीवर संकटाचे सावट निर्माण केले आहे. वाघजाईनगरला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे खराबवाडीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुनर्वसित गाव आणि वेगळेपणाची मागणी..
वाघजाईनगर हे धरणग्रस्तांचे पुनर्वसित गाव आहे. शासनाच्या नियमानुसार अशा गावांना विशेष दर्जा दिला जातो. मात्र, हे गाव तांत्रिकदृष्ट्या अजूनही खराबवाडी ग्रामपंचायतीचा भाग असल्याने, प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये अडथळे येत होते. याच कारणास्तव, वाघजाईनगर ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून आपल्या गावाला लवकरात लवकर खराबवाडीपासून विभक्त करून स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा रेटा लावला होता. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत, राज्य शासनाने आता या प्रक्रियेला गती देणारे पत्र काढले आहे.
सहा वर्षांचा प्रशासकीय वनवास आणि आता नवा पेच..
खराबवाडी ग्रामपंचायत गेल्या सहा वर्षांपासून प्रशासकाच्या ताब्यात आहे. निवडणुका व्हाव्यात यासाठी ग्रामस्थ सातत्याने आग्रही होते. वॉर्ड रचनेवरून काही मंडळींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने आणि आडमुठे धोरण अवलंबल्याने लोकशाही प्रक्रिया तब्बल सहा वर्षे ठप्प होती. नुकतीच १२ जून २०२६ रोजी वॉर्ड आरक्षण सोडत पार पडल्याने निवडणुकांचा मार्ग सुकर होईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र, आता वाघजाईनगरच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या प्रक्रियेमुळे निवडणुकीचा चेंडू पुन्हा एकदा अधांतरी लटकला आहे.
प्रशासनाची धावपळ आणि शंकांचे वातावरण..
ग्रामविकास विभागाने या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. जर वाघजाईनगर वेगळे करण्याची प्रक्रिया तातडीने राबवली, तर निवडणुकीची संपूर्ण वॉर्ड रचना आणि आरक्षण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागू शकते का? आणि त्यामुळे निवडणुकीला मोठा विलंब होईल का? असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.
ज्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या सहा वर्षांत निवडणुका रोखून धरल्या होत्या, त्यांना आता या नवीन प्रशासकीय पेचामुळे नक्की काय वाटत असेल, असा सवालही संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. आता खराबवाडीच्या निवडणुकीचे भविष्य पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले असून, यावर शासन आणि प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0