राजकीय : महायुतीची जागा अजितदादांकडे, पण रणजित जरे यांचा अर्ज अन् 'दिल्ली'वारीने वाढवली धाकधूक!
लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. चाकण नगर परिषदेचे बांधकाम सभापती आणि शिवसेनेचे नेते रणजीत सखाराम जरे यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, गटनेते नितीन गोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. जरे यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत.
महायुतीत तिढा अन् पुणे नेत्यांची दिल्लीवारी!
पुणे विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी शिंदे गट कमालीचा आग्रही होता. मात्र, ऐनवेळी ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. मुंबईत शेवटपर्यंत लॉबिंग करूनही जागा पदरात पडत नसल्याचे पाहून, पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांनी थेट 'दिल्ली' गाठली आहे.
खेडच्या नेत्याची चर्चा, निवडणुकीला मिळणार वेगळे वळण!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीला रवाना झालेल्या या तीन नेत्यांमध्ये खेड तालुक्यातील एका प्रभावशाली नेत्याचा समावेश आहे. महायुतीतील जागावाटपावरून असंतोष उफाळल्याने आणि पुण्याच्या जागेवर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने, या निवडणुकीला आता अनपेक्षित वळण लागले आहे.
दिल्ली दरबारी आता नेमकी काय खलबते होणार? शिवसेनेचे हे बंड शमणार की पुणे निवडणुकीत महायुतीचेच 'धनुष्यबाण' विरुद्ध 'घड्याळ' असा थेट सामना रंगणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या राजकीय घडामोडींमुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा रंग आता अधिकच गडद झाला असून, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1