Political Changes || खेडमध्ये राष्ट्रवादीची नवीन 'रणनिती'; 'किंगमेकर' संजय घनवटांना शह देण्यासाठी अंकुश राक्षे मैदानात?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(राजगुरूनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या खेड तालुका अध्यक्षपदी खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश सुदाम राक्षे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते श्री. राक्षे यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सध्या खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली ओहोटी आणि पक्षांतराचे सत्र पाहता, ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक असलेले अंकुश राक्षे यांच्या खांद्यावर आता आगामी काळात तालुक्यात पक्ष विस्ताराची मोठी जबाबदारी आली आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती..
या नियुक्ती सोहळ्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेपाटील, माजी नगरसेवक शंकर राक्षे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय पार्श्वभूमी आणि ओळख..
अंकुश राक्षे यांनी यापूर्वी खेड पंचायत समितीचे युवा सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. एक अभ्यासू व्यक्तीमत्व आणि आक्रमक वक्ते म्हणून ते जिल्ह्यात परिचित आहेत. विशेषतः कोरोना काळात त्यांनी गावपातळीवर केलेल्या उत्कृष्ट समाजकार्याची सर्वत्र प्रशंसा झाली होती. त्यांच्या पत्नी वसुधा राक्षे या बहिरवाडी गावच्या सरपंच असून, काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी चास-कडूस गटातून ताकदीने निवडणूक लढवली होती.
संजय घनवट यांना रोखण्याची राजकीय रणनीती तर नाही ना?
खेड तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय घनवट यांच्या भावजयी तनुजा घनवट यांनी अंकुश राक्षे यांच्या पत्नी वसुधा राक्षे यांचा पराभव केला होता.
तसेच, नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत संजय घनवट यांनी राजकीय कौशल्य वापरत राष्ट्रवादीचे काही संचालक आपल्या गळाला लावल्याची चर्चा रंगली होती. त्यापूर्वी अशोक राक्षे यांना राष्ट्रवादीतून फोडण्यात आणि पंचायत समितीमधील राष्ट्रवादीचे गटनेते शंकर कावडे यांची कडूस सोसायटीमधील सत्ता आपल्याकडे खेचून घेण्यातही घनवट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एकंदरीत, खेड तालुक्यात संजय घनवट हे एक प्रभावी 'किंगमेकर' म्हणून पुढे आले असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठएक धक्के दिले आहेत. अशा परिस्थितीत, या वाढत्या प्रभावाला आणि आव्हानांना प्रभावीपणे शह देण्यासाठीच पक्षश्रेष्ठींनी अंकुश राक्षे यांच्याकडे तालुका अध्यक्षपदाची सूत्रे सोपवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0