PDCC Bank Activity || खेड तालुक्यात सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचा झंझावात; करंजविहिरेत तब्बल ४० वर्षांचा गड ढासळला!
कोरेगाव, आसखेडसह करंजविहिरेत राष्ट्रवादी समर्थक उमेदवारांची बाजी; आमदार दिलीप मोहिते पाटील व गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब.
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
करंजविहिरे(ता. खेड) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) प्रतिनिधी निवडीत खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या प्रभावी नियोजनातून करंजविहिरे, कोरेगाव बुद्रुक आणि आसखेड या तिन्ही विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादी समर्थक उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.

करंजविहिरेत चार दशकांची प्रस्थापित सत्ता संपुष्टात..
या निवडणुकीत सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या करंजविहिरे सोसायटीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. येथे तब्बल ४० वर्षांची प्रस्थापित सत्ता उलथवून लावत राष्ट्रवादीचे गुलाब गणपत शिवेकर विजयी झाले. चार दशकांचा अभेद्य गड ढासळल्याने सहकार क्षेत्रातील सयाजीराव कोळेकर यांच्या गटासह विरोधकांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कार्यकर्त्यांची भक्कम एकजूट आणि सूक्ष्म रणनीतीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय मिळवला गेला.

नवनिर्वाचित प्रतिनिधी:
• करंजविहिरे विविध कार्यकारी सोसायटी: गुलाब गणपत शिवेकर
• कोरेगाव बुद्रुक सोसायटी: सरपंच दादासाहेब काल्हटकर
• आसखेड सोसायटी: प्राची कैलास लिंभोरे

करंजविहिरेसह कोरेगाव बुद्रुक आणि आसखेड येथेही राष्ट्रवादी समर्थकांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सहकार क्षेत्रावरील आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. या निकालांमुळे खेड तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात आमदार दिलीप मोहिते पाटील व गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले आहे.
निकालाची अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत आणि गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला. या वेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0