Crime Update || खराबवाडी गावातील महेश चव्हाणचे संतापजनक कृत्य: महिला सुरक्षारक्षकाची १ लाख ५ हजारांची रोकड आणि १ तोळ्याचे मंगळसूत्र हडपले..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणाऱ्या एका ३६ वर्षीय कष्टकरी सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) महिलेच्या माणुसकीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत एका भामट्याने तिच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वडिलांच्या आजारपणाचे आणि शस्त्रक्रियेचे खोटे भावनिक कारण पुढे करत या भामट्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १ लाख ५ हजार रुपयांची रोकड हडप केली असून, याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
खराबवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील सारासिटी सोसायटीत राहणाऱ्या ३६ वर्षीय फिर्यादी महिला सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. मे २०२५ ते ३० जून २०२५ दरम्यान आरोपी महेश बाळू चव्हाण (रा. वाघजाईनगर, ता. खेड) याने फिर्यादी महिलेशी जवळीक साधून तिचा विश्वास संपादन केला. "वडिलांचे तातडीने ऑपरेशन करायचे असून पैशांची अत्यंत गरज आहे," अशी भावनिक गळ घालून त्याने महिलेकडे मदतीची याचना केली.
एका गरजू मुलाला वडिलांच्या उपचारासाठी मदत व्हावी या प्रामाणिक भावनेतून कष्टकरी महिलेने आपल्याकडील साठवलेली १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि स्वतःचे सुमारे १ तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र महेश चव्हाणच्या स्वाधीन केले.
असा झाला विश्वासघात..
पैसे आणि सोन्याचे दागिने घेतल्यानंतर आरोपीने त्यातील केवळ ४५ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित १ लाख ५ हजार रुपये रोकड आणि १ तोळ्याचे मंगळसूत्र परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे आणि दागिने परत न मिळाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.
गुन्ह्याचा तपशील..
• आरोपी: महेश बाळू चव्हाण (रा. वाघजाईनगर, ता. खेड, जि. पुणे)
• दाखल गुन्हे कलम: बी.एन.एस. ३१८(२), भादवि ४१७ (फसवणूक व विश्वासघात)
• तपास अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक घुले व सहाय्यक पोलीस फौजदार चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
वडिलांच्या उपचाराचे सोंग रचून एका गरजू व कष्टकरी महिलेच्या घामाच्या पैशांवर आणि सौभाग्याच्या दागिन्यावर हात मारणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1