Road Activity || चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व वाहतूक प्रश्नांना वेग; एमआयडीसी सीईओ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज चाकण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. एमआयडीसी आणि जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या संयुक्त पाहणीदरम्यान रस्ते दुरुस्ती व वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले.
अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश..
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची पाहणी करताना, रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीची कामे विनाविलंब पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ज्या भागात रस्त्यांचे काँक्रिटीकरण अपूर्ण आहे, ते काम तातडीने पूर्ण करावे. तसेच हे काम करताना औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

टप्पा क्रमांक ५ मधील रस्त्याला गती देणार..
या पाहणी दौऱ्यात टप्पा क्रमांक ५ मधील कॉर्निंग कंपनीपासून पुणे-नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या उर्वरित रस्त्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्यांचे तात्काळ निराकरण करून काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या कामात जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून सर्व आवश्यक सहकार्य केले जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतूक अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

तळेगाव-चाकण महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सूचना..
तळेगाव-चाकण महामार्गावरील खराब रस्त्यांची स्थिती पाहता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे आणि खराब भागांची तात्काळ दुरुस्ती करून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. चाकणमधील वाढती औद्योगिक वाहतूक पाहता रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
चाकण चौकात उद्योजकांशी संवाद व चर्चा..
पाहणी दौऱ्यानंतर चाकण चौक येथे चाकण कृती समितीचे सदस्य, उद्योजक आणि विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा तसेच कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत प्रतिनिधींनी आपल्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडल्या. उद्योगांच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधांबाबत गांभीर्याने विचार करून प्राप्त झालेल्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी सीईओ दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
चाकण हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथील उद्योग, कामगार आणि मालवाहतूक सुरळीत चालण्यासाठी प्रशासन, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस आणि औद्योगिक संघटनां, चाकण ट्रॅफिक मुक्त कृती समिती यांनी परस्पर समन्वयाने आणि लोकसहभागातून काम करण्यावर या पाहणी दौऱ्यात विशेष भर देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0