२६ शेळ्यांचा कर्दनकाळ बिबट्या अखेर जेरबंद;नेरला परिसरात सुटकेचा निःश्वास...
प्रतिनिधी नितीन वरगंटीवार, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील नेरला परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या आणि तब्बल २६ शेळ्यांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.काल सकाळपासून सुरू असलेल्या थरारक शोधमोहिमेनंतर काल रात्री सुमारे ८ वाजता ही कारवाई यशस्वी ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने काल शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्यानंतर जवळील नहराच्या सिमेंट पाईपमध्ये आश्रय घेतला होता. बिबट्या त्याच ठिकाणी असल्याची खात्री झाल्यानंतर वनविभागाने तात्काळ सापळा रचत परिसरात पाळत ठेवली.
वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरआरटी (RRT) पथक आणि वनकर्मचाऱ्यांनी दिवसभर संयमाने व कौशल्याने मोहीम राबवली. पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याला बाहेर काढणे मोठे आव्हान होते, मात्र अखेर रात्री त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात यश आले.
पकडलेल्या बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी भिवखिडकी रोपवाटिका येथे हलविण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याची तपासणी केली जाणार आहे. प्रकृती स्थिर असल्यास पुढील प्रक्रियेनंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
या यशस्वी मोहिमेमुळे नेरला परिसरातील नागरिक व पशुपालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून,वनविभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0