मोठी बातमी : चाकण-शिक्रापूर रस्त्याचा 'कच्चा' कारभार: कडाचीवाडीत रस्ता खोदण्यास जबाबदार कोण? जल जीवनचा ठेकेदार संशयाच्या भोवऱ्यात?
दोषीवर कारवाई होणार का?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून, अंधाऱ्या रात्रीच्या आडोशाने रस्ते खोदण्याचे प्रकार खेड तालुक्यात नित्याचेच झाले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रकारात, चाकण-शिक्रापूर या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर कडाचीवाडी हद्दीत महाराष्ट्र जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराने मनमानी करत रस्ता खोदल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे सकाळी चाकण-शिक्रापूर मार्गावर भीषण वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
अभियंत्यांची कठोर भूमिका, राजकीय दबाव झुगारला..
या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) अभियंत्यांनी तात्काळ पाहणी केली. रस्ता अनधिकृतपणे खोदून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेता, MSIDC ने संबंधित ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, हा गुन्हा नोंदवू नये म्हणून काही स्थानिक राजकीय नेत्यांनी अभियंत्यांवर दबाव आणल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, सर्व दबावांना झुगारून पोलीस कारवाईसाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांकडून अभियंत्यांचे कौतुक होत आहे.विशेष म्हणजे या MSIDC चे अभियंते यांनी ठेकेदार यांनी जो रस्त्यात पाईप गाडला आहे तो रस्त्याच्या समांतर गाडला असल्याने त्यावरून मोठे कंटेनर गेले तर तो पाईप खाली दबला जाईल आणि तिथे ती पाईपलाईन पुन्हा रस्त्यात फुटू शकते हेही निदर्शनास आणुन दिले. पण मगरूर ठेकेदार आता हा पाईप काढून घेऊन तिथे इस्टिमेटमध्ये जसे माप आहे त्यानुसार काम करून घेतो की नाही? हेही पहावे लागणार आहे.
पाणी मात्र मिळेना, रस्त्यांची मात्र दूरदशा...
जल जीवन मिशनच्या या कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. "उन्हाळा संपत आला, तरीही पाणी मिळालेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकांमध्ये आठ-दहा दिवसांत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, ते फोल ठरले आहे. पाणी देणे तर दूर, उलट रस्त्यांची वाट लावून ठेवली आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
नागरिकांची मागणी: कडक कारवाई करा...
चाकण-शिक्रापूर रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनधिकृत खोदकाम करून धोका निर्माण करणाऱ्या ठेकेदारावर आता पोलिसांनी कोणतीही राजकीय तडजोड न करता कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
1
Angry
1
Sad
0
Wow
0