सामाजिक : महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे 'विभाजन' की नागरिकांची 'कोंडी'? प्रशासनाच्या अजब निर्णयामुळे ग्रामस्थ आक्रमक..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी, आशिष ढगे पाटील
महाळुंगे (इं) :: चाकण-तळेगाव पट्ट्यातील औद्योगिक वसाहतीची सुरक्षा वाऱ्यावर सोडून पोलीस प्रशासनाने केलेला 'तघलकी' कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये स्थानिक नागरिकांना आणि ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भागात विभाजन करण्यात आले. मात्र, हे विभाजन करताना भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न केल्याने खराबवाडी आणि महाळुंगे गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाचा 'अर्थहीन' घाईगडबडीचा कारभार..
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयातून काढण्यात आलेल्या या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या नवीन पोलीस ठाण्याच्या हद्द निश्चितीला अद्याप शासन स्तरावरून कोणतीही अधिकृत मान्यता मिळालेली नाही. असे असताना केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आयुक्तालयाने एवढी घाई का केली? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागरिकांच्या हरकती किंवा सूचना न घेता घेतलेला हा निर्णय नेमका कोणाच्या 'फायद्यासाठी' किंवा कोणत्या 'तडजोडी'साठी घेतला गेला, अशी शंका आता नागरिक जाहीरपणे विचारू लागले आहेत.

गावांचे तुकडे; गुन्हेगारी नियंत्रणाऐवजी गोंधळच जास्त!
• चाकण-तळेगाव रस्त्याची सीमारेषा मानून उत्तरेकडील भाग उत्तर पोलीस ठाण्याला आणि दक्षिणेकडील भाग दक्षिण पोलीस ठाण्याला जोडला गेल्याने एकाच गावच्या दोन सीमा तयार झाल्या आहेत. यामुळे:
• सामान्य नागरिकांना तक्रार देण्यासाठी कोणत्या ठाण्यात जावे, असा पेच पडत आहे.
• हद्दीच्या वादात पोलीस गाड्यांची टोलवाटोलवी होण्याची शक्यता वाढली आहे.
• खराबवाडी आणि महाळुंगे इंगळे या गावांची झालेली विभागणी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची आणि हास्यास्पद ठरत आहे.
वरिष्ठ पातळीवरून 'चेंडू' टोलवण्याचे राजकारण
स्थानिक पोलीस अधिकारी या विषयावर "हा आदेश वरून आला आहे" असे सांगून हात झटकत आहेत. जर हा निर्णय जनहितासाठी होता, तर जनतेचा आवाज का दाबला जात आहे? स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची मागणी आहे की, खराबवाडी व महाळुंगे इंगळे ही संपूर्ण गावे 'महाळुंगे दक्षिण' पोलीस ठाण्यातच समाविष्ट असावीत. मात्र, प्रशासन या साध्या मागणीकडेही दुर्लक्ष करत आहे.
"खराबवाडी आणि महाळुंगे गावच्या नागरिकांची मागणी पूर्णपणे रास्त आहे. प्रशासनाने लादलेला हा निर्णय अन्यायकारक आहे. आम्ही लवकरच नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न तडीस लावू. तोपर्यंत हा लढा थांबणार नाही."
— स्थानिक ग्रामस्थ व शिष्टमंडळ
प्रतिक्रिया:-
"नागरिकांची गैरसोय करून चालवलेला हा कारभार आम्हाला मान्य नाही. पोलीस ठाण्याच्या चुकीच्या गाव विभाजनामुळे लोकांचे हाल होत आहेत. मी या मागणीशी पूर्णपणे सहमत असून, लवकरच वरिष्ठ पातळीवर शिष्टमंडळ नेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल."
— गणेश बोत्रे (सदस्य, जिल्हा परिषद)
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0