BIG BREAKING : आळंदीत धक्कादायक घटना: वादातून महिलेचा गळा आवळून खून; आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळंदी (पुणे): कामावर जात असताना झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान हत्येत झाल्याची धक्कादायक घटना सोळू (ता. खेड) येथील जंगलात उघडकीस आली आहे. एका ३२ वर्षीय तरुणाने महिलेचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. मात्र, आळंदी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पार्वती दगडूजी दराडे (वय ३०, रा. माऊली पार्क, आळंदी) आणि आरोपी विष्णू महादेव पावडे (वय ३२, मूळ रा. परभणी, सध्या रा. धानोरे, ता. खेड) हे एकमेकांच्या ओळखीचे होते. दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. शुक्रवारी (दि. २०) दुपारी चार वाजताच्या सुमारास ते दोघेही दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघाले होते.
सोळू गावच्या हद्दीतील जंगल परिसरात पोहोचल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात विष्णूने पार्वतीचा गळा आवळून तिची जागीच हत्या केली.
पुरावा नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न..
खून केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये, या भीतीने आरोपी विष्णूने हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्याने स्कार्फच्या सहाय्याने पार्वतीचा मृतदेह जमिनीपासून चार फूट उंचीवर एका झाडाला लटकवला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांची तत्परता आणि कारवाई:
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ज्या पद्धतीने लटकलेला होता, त्यावरून पोलिसांना प्रथमदर्शनी हा प्रकार संशयास्पद वाटला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्राला वेग दिला आणि संशयित विष्णू पाावडे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी फिर्याद दिली असून, आळंदी पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
5
Wow
0