कोहलगाव शिवारात हत्तींचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त...
- कोहलगाव शिवारात हत्तींचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त...
- हातातोंडाशी आलेला घास हिरावला; हत्तींच्या थैमानाने बळीराजा हतबल
- नवेगावबांध परिसरात २६ हत्तींचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
प्रतिनिधी -- पंकज परशुरामकर,गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरातील कोहलगाव शेतशिवारात गेल्या ४८ तासांपासून हत्तींच्या महाकाय कळपाने थैमान घातले आहे. सुमारे २६ हत्तींच्या या कळपामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हतबल झाला आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या धानपिक फुलोऱ्यावर असून काही ठिकाणी कापणीची तयारी सुरू होती. मात्र, हत्तींच्या कळपाने शेतात घुसून पिकांची अक्षरशः तुडवणूक केली आहे. त्यामुळे सोन्यासारख्या पिकाची राखरांगोळी झाली आहे. दूधराम मडावी, रोहित धोटे, महादेव धोटे, किसन मुनेश्वर यांसारख्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या डोळ्यादेखत उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. “आता जगायचे कसे?” असा आर्त सवाल शेतकरी करत आहेत.
हत्तींचा कळप विशेषतः रात्री अधिक आक्रमक होत असून गावाच्या दिशेने त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली असून, गावात दहशतीचे वातावरण आहे.
दरम्यान, वनविभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत विशेष रेस्क्यू टीम तैनात केली आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, सतत गस्त घालण्यात येत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी सदाशिव अवगान यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. “पंचनामे करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालू नये,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे २४ तासांत पंचनामे करण्याची, हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची आणि तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. कोहलगाव परिसर भयमुक्त करण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0