Murder Case || धक्का लागल्याचा किरकोळ वाद बेतला जीवावर; चाकण दक्षिण पोलिसांकडून अवघ्या ४८ तासांत थरारक मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश!

May 18, 2026 - 21:57
 0
Murder Case || धक्का लागल्याचा किरकोळ वाद बेतला जीवावर; चाकण दक्षिण पोलिसांकडून अवघ्या ४८ तासांत थरारक मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण (पुणे): नुसता धक्का लागल्याच्या एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे उघडकीस आली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना, केवळ तांत्रिक विश्लेषण आणि खाचखळग्यांचा मागोवा घेत चाकण दक्षिण पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या ४८ तासांत तीन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

मध्यरात्रीचा तो थरार अन् रक्ताने माखलेला दगड..

घटना १४ मे २०२६ रोजी रात्री ११:४० वाजण्याच्या सुमारास घडली. नाणेकरवाडी (ता. खेड) येथील आय.ए.आय कंपनीच्या मागील बाजूच्या रस्त्यावरून तीन अनोळखी इसम एका गंभीर जखमी व्यक्तीला उचलून घेऊन जात असल्याचे एका फिर्यादीच्या निदर्शनास आले. त्या जखमी व्यक्तीच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता आणि घटनास्थळी रक्ताने माखलेला मोठा दगड पडलेला होता. फिर्यादीने प्रसंगावधान राखत तातडीने चाकण दक्षिण पोलीस ठाण्याला माहिती दिली. 

उपचारादरम्यान मृत्यू अन् 'खुनाचा' गुन्हा दाखल..

पोलीसांनी जखमीला तात्काळ चाकण येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पिंपरी येथील वायसीएम (YCM) रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, १५ मे रोजी उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुरुवातीला चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३(५) अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता, मात्र मृत्यूनंतर त्यात कलम १०३ (खून) चा वाढीव बदल करण्यात आला.

८० सीसीटीव्ही अन् ६ तालुके; पोलिसांचा असा रचला चक्रव्यूह...

मृताची ओळख पटलेली नव्हती आणि आरोपी पूर्णपणे अनोळखी असल्याने पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हान होते. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या डीबी (DB) पथकाने तांत्रिक तपासाचे चक्र फिरवले. पोलिसांनी चाकण, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय आणि थेट परजिल्ह्यांतून तब्बल ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेजची बारीक तपासणी केली.

मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे धागेदोरे पुणे आणि नाशिक जिल्ह्याशी जोडलेले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास पथकाने खेड, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि थेट नाशिक परिसरात धाडसी शोधमोहीम राबवून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१) रोहन मोहन शिंदे (वय २४, रा. वाडा रोड, खेड, मूळ रा. राहुरी, जि. अहिल्यानगर)

२) योगेश पोपट पवार (वय २३, रा. बिरदवडी, ता. खेड, मूळ रा. भोसरी, पुणे)

३) रविंद्र राजेंद्र शेजुळ (वय ३०, रा. बिरदवडी, ता. खेड, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) 

पोलीसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, रस्त्याने चालताना केवळ 'किरकोळ धक्का लागला' या कारणावरून झालेल्या वादातून त्यांनी डोक्यात दगड घालून हा खून केल्याची कबुली दिली आहे.

'या' जाबांज पथकाने केली कामगिरी..

यात चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार जाधव, पोलीस हवालदार शिवाजी चव्हाण, मंगेश फापाळे, अमोल माटे, रेवनाथ खेडकर, आदम शेख, विशाल बंड, सुनील भागवत आणि महादेव बिक्कड यांनी अत्यंत चोख भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी