मोठी बातमी : आळंदीत गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई: ३३७ ग्रॅम गांजासह दोन आरोपी जेरबंद..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पुणे(आळंदी) : आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विरोधात गुन्हे शाखा युनिट-३ ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ३३७ ग्रॅम गांजासह रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून स्कुटीसह ७६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस हवालदार श्रीधन इचके, पोलीस अंमलदार निखिल फापाळे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, तुषार वराडे आणि स्वप्नील महाले हे पथक परिसरात पेट्रोलींग करत होते. दरम्यान, पोलीस हवालदार श्रीधन इचके आणि पोलीस अंमलदार निखिल फापाळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन इसम आळंदी घाटाच्या परिसरात गांजा घेऊन येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचला आणि संशयित आरोपींना गांजासह ताब्यात घेतले. याप्रकरणी एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी:
१) विनयदिप गंगाधर मानवते (वय २९, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. आरळ, ता. वसमत, जि. हिंगोली)
२) इस्माईल मगबुल पठाण (वय २५, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. इंदिरा नगर, जि. सोलापूर)
तसेच, या गुन्ह्यात सहभागी असलेला 'मनीष' नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल:
• १६ हजार ८५० रुपये किमतीचा ३३७ ग्रॅम गांजा
• ६० हजार रुपये किमतीची स्कुटी
• एकूण जप्त माल: ७६ हजार ८५० रुपये
सदर प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशनचे तपास पथक करत आहे. गुन्हे शाखा युनिट-३ च्या या कारवाईमुळे आळंदी परिसरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0