मोठी बातमी : कंपनीची भिंत अंगावर कोसळून मजूर दाम्पत्याचा मृत्यू; तळवडे येथील धक्कादायक घटना..!
ठेकेदाराकडून कामगारांची सुरक्षा रामभरोसे..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चिखली (पुणे): औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरात शुक्रवारी (दि. १३) एक भीषण दुर्घटना घडली. एका कंपनीच्या संरक्षक भिंतीचे (वॉल कंपाऊंड) बांधकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळल्याने कामावर असलेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक कामगार जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथील जागा मालक सदाशिव आगळे यांनी त्यांच्या इंडक्शन थर्मल कंपनीच्या खुल्या भूखंडाला विटांचे वॉल कंपाऊंड बांधण्याचे कंत्राट दीपक जाधव (रा. चाकण) यांना दिले होते. या कामासाठी जाधव यांनी चाकण येथील लेबर नाक्यावरून मजूर आणले होते.
शुक्रवारी(दि. १३) सायंकाळी ४:३० च्या सुमारास भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक संपूर्ण बांधकाम मजुरांच्या अंगावर कोसळले. यामध्ये खालील मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले:
• मृत: सचिन शंकर राठोड (वय ३०) आणि कोमल सचिन राठोड (वय २५) – मूळ गाव: लोहा, जि. नांदेड. सध्या राहणार: मेदनकरवाडी, चाकण.
• जखमी: मनोहर भिकू चव्हाण (वय ३८) – राहणार: गाडगे आळी, चाकण.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भिंत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या राठोड दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर मनोहर चव्हाण यांच्यावर देहूगाव येथील इम्पेरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, 'बांधकाम ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का?' असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलीस याप्रकरणी कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया करत आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0