Crime News || ५० कोटींच्या खंडणीसाठी गोळीबार करणारी टोळी गजाआड; पुणे पोलिसांची परराज्यात धडाकेबाज कामगिरी..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पुणे : पुण्यातील एका नामांकित व्यावसायिकाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागत शहरात दहशत पसरवणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या गंभीर गुन्ह्यातील चार मुख्य आरोपींना हरियाणा आणि राजस्थानमधून अटक करण्यात आली असून, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपींचे मनसुबे उधळले गेले आहेत.
नेमकी घटना काय?
गेल्या २२ जून २०२६ रोजी एका नामांकित व्यावसायिकाला फोनवरून ५० कोटींची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासांतच संबंधित व्यावसायिकाच्या कंपनीच्या गेटवर ४ राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. पुणे गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता, गोळीबार करणारे आरोपी गुन्हा करून परराज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
पाच दिवस, चार राज्ये आणि यशस्वी शोधमोहीम..
पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये तळ ठोकला. सलग पाच दिवस केलेल्या थरारक शोधमोहिमेनंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. पवन प्रकाशराम बार्ड (वय २४): राजस्थानमधून अटक.
२. सत्यप्रकाश कालूराम शिलोरा (वय २५): कंपनीतील माहिती पुरवणारा मुख्य सूत्रधार, पुण्यातील हांडेवाडीतून अटक.
३. रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (वय ३३): हरियाणातील रहिवासी, राजस्थानमधून अटक. याच्याकडून १ गावठी पिस्तूल आणि १० राऊंड जप्त.
४. विधी संघर्षग्रस्त बालक (अल्पवयीन): याच्याकडून २ गावठी पिस्तूल आणि २० राऊंड जप्त..
पोलीस पथकाची 'सिंघम' कामगिरी..
सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन माने, प्रशांत अन्नछत्रे, अमर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, श्रीकांत चव्हाण, प्रसन्ना जराड, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, महिला उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि त्यांच्यासोबतच्या संपूर्ण पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, पुणे पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0