Impact News || 'झोरी'चे पाणी आटले! आमदार बाबाजी काळेंच्या दणक्यानंतर खराबवाडी-नाणेकरवाडीत पाणीवाटपासाठी नवा गडी..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खराबवाडी(चाकण) : पाणी असूनही केवळ नियोजनशून्य कारभारामुळे तहानलेल्या खराबवाडी आणि नाणेकरवाडी ग्रामस्थांच्या संतापाचा अखेर बांध फुटला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) पाणीपुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार बाबाजी काळे यांनी थेट 'अॅक्शन मोड'मध्ये येत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान टोचले. परिणामी, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'झोरी' नामक कर्मचाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली असून, आता पाणी सोडण्यासाठी नवीन व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
खराबवाडी आणि नाणेकरवाडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या पाण्याचे नियोजन एका खासगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. या ठेकेदाराने पाणी सोडण्यासाठी 'झोरी' नावाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती. मात्र, संबंधित व्यक्तीकडून पाणी वाटप करताना प्रचंड वशिलेबाजी आणि नियोजनशून्य कारभार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. "पाणी असूनही आम्हाला तहानलेले राहावे लागते," अशा लेखी तक्रारींचा पाऊस नागरिकांनी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे पाडला होता. या व्यक्ती बद्दल ग्रामपंचायत खराबवाडी व नाणेकरवाडी यांचीही तक्रार होती. या व्यक्तीमुळे दोनही ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे या "झोरी" बाबाला हटविल्यामुळे ग्रामपंचायतही पाणी नियोजनासाठी कंबर कसतांना दिसेल यात कोणती शंका नाही.
आमदारांचा 'पावरफुल' हस्तक्षेप..
नागरिकांची ससेहोलपट पाहून आमदार बाबाजी काळे यांनी तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या परिसरात पाणी असूनही जनतेला त्रास का होतोय? असा जाब विचारत त्यांनी संबंधित तक्रारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठेकेदाराला तातडीने आदेश दिले की, वादग्रस्त ठरलेल्या 'झोरी' ऐवजी दुसऱ्या सक्षम व्यक्तीची नेमणूक करावी.
नव्या नेमणुकीने आशेचा किरण..
आमदारांच्या सूचनेनुसार ठेकेदाराने आता पाणी वाटपासाठी तातडीने दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे. जुन्या कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभाराला चाप लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नवनियुक्त कर्मचाऱ्यासमोर आता विस्कळीत झालेली पाणीपुरवठा व्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
"आमदारांनी तातडीने दखल घेतल्यामुळे आमचा पाणीप्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. आता नवीन व्यक्तीने जर प्रामाणिकपणे आणि वेळेत पाणी सोडले, तर सर्वांना मुबलक पाणी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे."
— स्थानिक नागरिक, खराबवाडी.
आता या बदलामुळे खराबवाडी आणि नाणेकरवाडीकरांची 'पाणी-पाणी' करण्याची ओढ थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
9
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0