महसूली अभियान : चाकण येथे 'महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात; ३,१९६ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : "शासन आपल्या दारी" हा मुख्य संकल्प ठेवून खेड तालुक्यातील चाकण मंडळ भागांतर्गत भव्य 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात पार पडले. शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ रोजी चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
खेडचे उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) श्री. अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार श्री. प्रशांत बेडसे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व इतर शासकीय विभागांच्या प्रमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये विविध विभागांचे स्टॉल उभारून नागरिकांना जागेवरच सेवा आणि दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून एकूण ३,१९६ दाखले व विविध योजनांचे लाभ मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

शिबिरात मिळालेला योजनांचा सविस्तर लाभ:
१. महसूल व भूमी अभिलेख विभाग:
• ई-फेरफार प्रणाली अंतर्गत एकूण १४१ फेरफार निर्गत करण्यात आले.
• ६८७ सातबारा (७/१२) आणि २६७ ८-अ उताऱ्यांचे वाटप करण्यात आले.
• 'जिवंत ७/१२ मोहीम' अंतर्गत १७ वारस नोंदी मंजूर करून दुरुस्त सातबारा लाभार्थ्यांना देण्यात आला.
• कलम १५५ अंतर्गत दुरुस्तीसाठी ०८ अर्ज प्राप्त झाले, तर भूमी अभिलेख विभागाकडे ०७ अर्ज दाखल झाले.
२.शैक्षणिक दाखले व प्रमाणपत्रे:
विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरले. यामध्ये:
• डोमासाईल (अधिवास) प्रमाणपत्र: १,५९०
• जात प्रमाणपत्र: २६९
• उत्पन्नाचे दाखले: ५९०
• नवीन अर्जांची प्राप्ती: ३८७
३. पुरवठा विभाग (रेशन कार्ड):
• ४५ गरजू कुटुंबांना रेशन कार्डचे थेट वाटप करण्यात आले, तर नवीन रेशन कार्डसाठी ४१ अर्ज प्राप्त झाले.
४.सामाजिक न्याय व इतर योजना:
• संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या २३ लाभार्थ्यांना लाभ मंजूर प्रमाणपत्रे देण्यात आली, तर ४६ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले.
• 'पीएम किसान' योजनेअंतर्गत ०२ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.
• कृषी विभागामार्फत १५ लाभार्थ्यांना 'महा-डीबीटी' योजनेचा लाभ देण्यात आला.
५. नागरिक सेवा (आधार व आरोग्य):
• ४६० नागरिकांना आधार कार्डचे वाटप करण्यात आले, तर ०७ लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले.
• आरोग्य विभागामार्फत ९७ नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा व तपासणीचा लाभ देण्यात आला.
• महिला व बालविकास विभागाकडून ३५ महिला व लाभार्थ्यांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
६.विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम (S.I.R.):
• तहसीलदार कार्यालय खेड व नगरपरिषद चाकण यांच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चालू असलेल्या विशेष मोहिमेत १५ मतदारांचे मॅपिंग यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
अधिकारी व मान्यवरांचे मार्गदर्शन:
याप्रसंगी बोलताना तहसीलदार श्री. प्रशांत बेडसे पाटील यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. तर उपविभागीय अधिकारी श्री. अनिल दौंडे यांनी महसूल विभागाच्या विविध डिजिटल योजना आणि नवीन महसूल सुधारणांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाच्या या गतिमान कामाचे कौतुक केले आणि इतर महसुली मंडळांमध्येही अशाच प्रकारची शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन केले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या शिबिरास खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीम. मनिषाताई गोरे, उपनगराध्यक्षा सुवर्णा शाम राक्षे, चाकण नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव, नायब तहसीलदार रविंद्र मोरे (उपविभागीय कार्यालय), निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, महसूल नायब तहसीलदार राम बिजे, निवडणूक नायब तहसीलदार मनिषा खैरे, पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार, चाकणचे मंडळ अधिकारी चेतनकुमार चासकर यांच्यासह चाकण नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चाकण मंडळ भागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), महसूल सेवक आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन चाकण व अधिनस्त ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळ अधिकारी चेतनकुमार चासकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले. शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी यावेळी मोठा आनंद व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0