कौतुकास्पद : माजी सैनिकाची शिवभक्ती! स्वतःच्या चार मजली इमारतीवर साकारला छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
भामा आसखेड : शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर खेड तालुक्यातील शिंदे गावात एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद उपक्रम पाहायला मिळाला. खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष आणि सैन्य दलातील सेवानिवृत्त मेजर दत्तात्रय टेमगिरे यांनी आपल्या नवनिर्मित चार मजली निवासस्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा उभारला आहे. या उपक्रमाची सध्या संपूर्ण तालुक्यात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

४ लाखांचा भव्य पुतळा अन् शिवभक्तांचा उत्साह..
मेजर टेमगिरे यांनी आपल्या घराच्या छतावर सुमारे ४ लाख रुपये खर्च करून हा देखणा अश्वारूढ पुतळा बसवला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून स्थानिक शिवप्रेमींच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. स्वतः माजी सैनिक असल्याने टेमगिरे यांची राष्ट्रभक्ती आणि मराठा इतिहासाप्रती असलेली निष्ठा या कृतीतून अधोरेखित झाली आहे.
'आदर्श पिढीसाठी महाराजांचे स्मरण'..
पुतळा अनावरण प्रसंगी भावना व्यक्त करताना मेजर दत्तात्रय टेमगिरे म्हणाले की:
"छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्ती नसून ते आजही आपल्या जीवनाचे आदर्श आहेत. हा पुतळा जेव्हा जेव्हा डोळ्यांसमोर येईल, तेव्हा प्रत्येकाला महाराजांच्या शौर्य, न्याय आणि नेतृत्वाच्या गुणांची आठवण होईल. नवीन पिढीला स्वराज्याची जाणीव करून देण्यासाठीच आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे."
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव..
या कार्यक्रमास खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शिंदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इमारतीवर पुतळा उभारल्याने या निवासस्थानाला आता ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे. गावकरी आणि शिवभक्त या पुतळ्याचे फोटो काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत असून, मेजर टेमगिरे यांच्या या अनोख्या शिवभक्तीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
4