Social Activity || डीजेच्या आवाजापेक्षा सामाजिक बांधिलकीचा गजर! खराबवाडीत स्व. प्रतिक माने यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; मिरवणुका रद्द करत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा 'विघ्नहर्ता' मंडळाचा आदर्श..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : आपल्या दिवंगत सहकाऱ्याच्या अकाली जाण्याचे दुःख बाजूला सारत त्याच्या आठवणींना सामाजिक सेवेची जोड देणारा एक स्तुत्य उपक्रम खराबवाडी येथे पार पडला. विघ्नहर्ता मित्र मंडळ, खराबवाडी यांचा निष्ठावंत कार्यकर्ता स्व. कु. प्रतिक माने याचे सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्याच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ विघ्नहर्ता मित्र मंडळ आणि मेडिकेअर हॉस्पिटल, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील तरुण आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मिरवणुकांचा खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी..
सन २०११ मध्ये स्थापन झालेल्या विघ्नहर्ता मित्र मंडळाचे यंदा १६ वे वर्ष आहे. मंडळाचा कार्यकर्ता प्रतिक माने याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण मंडळावर आणि परिसरावर शोककळा पसरली होती. याच दुःखाची जाणीव ठेवून मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवातील भव्य-दिव्य होणाऱ्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका रद्द करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला आहे. उत्सवातील अनाठायी खर्च आणि दिखाऊपणा टाळून हा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा पायंडा मंडळाने घालून दिला आहे.
सामाजिक कार्याची अखंड परंपरा...
विघ्नहर्ता मित्र मंडळाने स्थापनेपासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपली आहे. यापूर्वी जागतिक कोरोना संकटकाळात मंडळाने गरजूंना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले होते. याशिवाय पाबळ येथील मतिमंद मुलांना खाऊ व किराणा साहित्याचे वाटप करणे, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे यांसारख्या विविध लोकोपयोगी उपक्रमांतून मंडळाने आपला सामाजिक ठसा उमटवला आहे.

उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते..
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सहादू कड, उपाध्यक्ष नितिन कड, कार्याध्यक्ष बापू कड, खजिनदार विजय गायकवाड आणि सचिव अजय गायकवाड यांनी विशेष नियोजन केले. तर या उपक्रमासाठी मार्गदर्शकांची भूमिका मंगेश कड यांनी भूषविली.
याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते मिथुन गायकवाड, तन्मय कड, कुणाल कड, राहुल गाडेकर, संतोष महतो, शाम यादव, सनी यादव, कपिल वर्मा, सचिन वर्मा, विजय भांबळे, प्रभात कड, आदित्य पौळ यांच्यासह परिसरातील नागरिक आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या दिवंगत मित्राला अशा रचनात्मक आणि जीवनदायी कार्यातून वाहिलेली ही श्रद्धांजली परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0