सामाजिक : मातीशी नातं अन् निसर्गाचा सन्मान! अड्याळच्या ‘श्री छत्रपती मंडळा’चा प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवातून नवा आदर्श..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी नितीन वरगंटीवार
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील होळी चौक परिसरातील ‘श्री छत्रपती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळा’ने यंदा पर्यावरणस्नेही उपक्रमांची कास धरत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संस्कृतीचे जतन आणि निसर्गाचे संवर्धन यांचा सुरेख मेळ घालत मंडळाने यंदाचा गणेशोत्सव पूर्णतः प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा केला.
मंडळाने श्रींच्या स्थापनेसाठी पारंपरिक शाडूच्या मातीच्या मूर्तीला प्राधान्य दिले. सजावटीमध्ये थर्माकोल किंवा प्लास्टिकचा लवलेशही न ठेवता शेतीतील नैसर्गिक साहित्य, मातीची भांडी, पानांच्या पत्रावळी, धान्य, सुती कापड आणि जूट (ताग) यांचा कल्पक वापर करून मनमोहक देखावा साकारला. विजेच्या अतिझगमगाटाला फाटा देत पारंपरिक तेलाचे दिवे प्रज्वलित करून स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त उत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणली.
या उपक्रमाविषयी बोलताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आपली संस्कृती ही आपली शान आहे. सण-उत्सवांतून केवळ आनंद न घेता आपल्या मातीशी आणि परंपरेशी असलेले घट्ट नाते जपले गेले पाहिजे. जुन्या, निसर्गपूरक पद्धतींचे संवर्धन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.”
मंडळाने उत्सवाच्या माध्यमातून परिसर स्वच्छता राखणे, झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती केली. “हिरवी झाडे राखूया, गणरायाचा आशीर्वाद कायम ठेवूया; स्वच्छ गणेशोत्सव साजरा करून हिरवे भविष्य घडवूया,” असा पर्यावरणपूरक संदेश देत मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली. श्री छत्रपती गणेश मंडळाच्या या पर्यावरणस्नेही उपक्रमाचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0