राजकीय : नानेकरवाडी-महाळूंगे गटात गणेश बोत्रेंचा झंझावात; खराबवाडीतील 'चाणक्य' नितीकार सपशेल अपयशी.. !
लोकन्याय मराठी प्रतिनिधी - आशिष ढगे पाटील
चाकण : नानेकरवाडी-महाळूंगे जिल्हा परिषद गटाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत गणेश बोत्रे यांनी 'मशाल' चिन्हाचे उमेदवार जीवन खराबी यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत गणेश बोत्रे यांच्या 'मायक्रो' नियोजनापुढे खराबवाडीतील स्वयंघोषित राजकीय चाणक्यांची रणनीती सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
त्रिकोणी लढतीत बोत्रेंची सरशी..
सुरुवातीला चौरंगी वाटणारी ही निवडणूक भाजप नेते संदीप सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्रिकोणी झाली. 'घड्याळ' चिन्हावर गणेश बोत्रे, 'मशाल' चिन्हावर जीवन खराबी आणि 'धनुष्यबाण' चिन्हावर गणेश नानेकर यांच्यात थेट लढत झाली. मात्र, खराबवाडीतील काही रणनीतीकारांनी निवडणुकीचे नियोजन स्वतःच्या ताब्यात घेऊन जीवन खराबी यांनाच अंधारात ठेवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
'नियोजन' ठरले विजयाचे गमक..
गणेश बोत्रे यांनी विरोधकांच्या कच्च्या दुव्यांचा अचूक शोध घेतला. त्यांनी केवळ एका गावावर लक्ष केंद्रित न करता सर्व गावांत 'मायक्रो मॅनेजमेंट'वर भर दिला. दुसरीकडे, खराबवाडीतील चाणक्यांनी केवळ स्वतःच्या गावातून मतदान वाढवण्यावर भर दिला आणि बाहेरील गावांकडे दुर्लक्ष केले. याच ढिसाळ नियोजनाचा फायदा बोत्रे यांनी उचलला.
दिग्गज नेत्यांची साथ आणि ऐनवेळची समीकरणे..
निवडणुकीच्या रणधुमाळीत गणेश बोत्रे यांनी अत्यंत चाणाक्षपणे राजकीय खेळी खेळल्या:
संदीप सोमवंशी यांची साथ: अर्ज मागे घेतल्यानंतर बोत्रे यांनी तातडीने सोमवंशी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवले.
संभाजीराजे खराबी यांची 'एन्ट्री': राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संभाजीराजे खराबी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन बोत्रे यांना पाठिंबा जाहीर केला. हीच घटना जीवन खराबी यांच्या पराभवाची मुख्य ठिणगी ठरली.
एकजूट फळी: संतोष खराबी, राहुल शेलार आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी थेट मैदानात उतरून बोत्रेंचे काम केले, ज्यामुळे खराबवाडी गावातच जीवन खराबी यांच्या विरोधात एक मोठी फळी निर्माण झाली.
पराभवाचे आत्मचिंतन गरजेचे..
जीवन खराबी यांनी उमेदवार म्हणून आपली १०० टक्के ताकद लावली, मात्र त्यांच्या यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे त्यांना पराभवाचा धक्का बसला. राजकारणात केवळ 'चाणक्य' बनून चालत नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवरची समीकरणे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी महत्त्वाची असते, हेच या निकालाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
1
Love
0
Funny
3
Angry
0
Sad
1
Wow
1