Political Update || खेडच्या राजकीय आखाड्यात 'आजी-माजी'चा धुराळा; अन्य नेत्यांच्या मौनाचा 'खेळ' कळेना..!

Jun 19, 2026 - 21:22
 0
Political Update || खेडच्या राजकीय आखाड्यात 'आजी-माजी'चा धुराळा; अन्य नेत्यांच्या मौनाचा 'खेळ' कळेना..!

लोकन्याय विशेष..

खेड(राजगुरूनगर) : सध्या खेड तालुक्यात श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि विविध विकासकामांच्या श्रेयवादावरून विद्यमान आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे दोघेही एकमेकांवर जोरदार शाब्दिक प्रहार करत आहेत. मात्र, त्यांच्या या टोकाच्या संघर्षामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांच्या पक्षांतील अन्य पदाधिकारी आणि नेते या वादावर पूर्णपणे 'मौन' बाळगून असल्याचे चित्र आहे. या मौनामागे केवळ सावधगिरी आहे की, 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' घेण्याची रणनीती, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

२०२९ च्या विधानसभा निवडणुकीचे 'समसमीकरण'

​राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, अक्षय जाधव, खेड बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य विजय शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर मुंगसे यांच्यासारख्या प्रबळ इच्छुकांचा समावेश आहे. हे सर्व नेते सध्याच्या वादात कोणताही हस्तक्षेप न करता, लांबूनच परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे दिसते. स्वतःचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ नये, म्हणून हे सर्वजण सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत.

काय आहे हा राजकीय 'पॅटर्न'?

​आमदार बाबाजी काळे आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष इतका टोकाचा आहे की, एकीकडून 'आरे' झाले की दुसरीकडून लगेच 'कारे'ची प्रतिक्रिया उमटते. यामुळे असाही तर्क लावला जात आहे की, हे दोघेही मुद्दाम असा आभास निर्माण करत आहेत का, की विधानसभेच्या रिंगणात फक्त आम्हीच प्रमुख स्पर्धक आहोत? अशा प्रकारे ते इतर इच्छुकांना संधीच उपलब्ध होऊ देत नाहीत का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, जर भविष्यात हे दोन्ही नेते "आम्ही तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर संघर्ष केला, तेव्हा हे इच्छुक नेमके कुठे होते?" असा सवाल उपस्थित करून अन्य इच्छुकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे, सध्या गप्प बसणारे इच्छुक नेते खरोखरच या वादाचा फायदा घेतात, की या वादातून काही नवीन समीकरणे जुळवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सध्या तरी, या आजी-माजी आमदारांच्या 'आगपाखडी'चा आनंद घेत तालुक्यातील अन्य नेते स्वतःची राजकीय पोळी भाजण्याची तयारी करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. खेडच्या राजकारणातील हा 'शांततेचा काळ' पुढे काय वळण घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी