राजकीय : खेड तालुक्यात ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचे बिगुल वाजले; औद्योगिक पट्ट्यातील गावांमध्ये उत्सुकता वाढली..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(राजगुरुनगर) :राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, खेड तालुक्यातील सन २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या एकूण १०० च्या वरती ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी तहसीलदारांनी विशेष अध्यासी अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, येत्या ११ आणि १२ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभेमार्फत ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

खराबवाडी ग्रामपंचायत आरक्षणाकडे विशेष लक्ष..
खेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये खराबवाडी ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, गेल्या ५ ते ६ वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राज आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने गावकरी आणि स्थानिक राजकारण्यांमध्ये या आरक्षण सोडतीबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

औद्योगिक पट्ट्यातील गावांचा समावेश..
या आरक्षण सोडतीमध्ये खेड तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे, ज्या औद्योगिक वसाहतींच्या आणि वेगाने नागरीकरण होत असलेल्या परिसरात येतात. यात प्रामुख्याने नाणेकरवाडी,मोई, महाळुंगे, आंबेठाण, कुरुळी आणि वासुली यांसारख्या महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींचे आरक्षण कसे निघणार आणि कोणत्या प्रभागात बदल होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कार्यक्रमाची व्याप्ती आणि पारदर्शकता..
या मोहिमेमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची निश्चिती केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी नेमणूक केलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ९ जून २०२६ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ही आरक्षण सोडत अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचे निर्देश तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिले आहेत. ही सोडत ग्रामसभेत उपस्थित असणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून निष्पक्षपणे पार पाडली जाणार आहे.
संबंधित ग्रामसेवकांनी या विशेष ग्रामसभेची पूर्वसूचना ८ जून २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी गावातील सार्वजनिक ठिकाणी, तलाठी कार्यालयात आणि ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0