मोठी बातमी : चाकण एमआयडीसीत धावती PMPML बस भस्मसात; चालक-वाहकाच्या सतर्कतेने ५० कामगारांचे प्राण वाचले..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीसमोर आज एक भीषण दुर्घटना टळली. निगडीहून महाळुंगे एमआयडीसीकडे जाणाऱ्या एका पी़एमपीएल बसला अचानक भीषण आग लागली. बसमध्ये ५० प्रवासी असतानाच ही घटना घडली, मात्र चालक आणि वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
नेमकी घटना काय?
सदर बस ही औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी विशेष फेरी म्हणून धावत होती. महिंद्रा कंपनीजवळ बस आली असताना अचानक इंजिनच्या बाजूने धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमधील सुमारे ५० प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. प्रवाशांनी पायउतार होताच काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज..
ही बस इलेक्ट्रिक (e-bus) असल्याची प्राथमिक माहिती असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही, प्राथमिक स्तरावर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली, मात्र तोपर्यंत बसचा सांगाडाच शिल्लक राहिला होता.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर..
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. औद्योगिक पट्ट्यातील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
2
Sad
3
Wow
1