राजकीय : आमदार बाबाजी काळेंची 'मशाल' नाणेकरवाडी-महाळुंगे गटात बॅकफुटवर; बाहेरील उमेदवाराचा फटका की निष्ठावंतांची नाराजी?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी, आशिष ढगे पाटील
चाकण : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या नाणेकरवाडी-महाळुंगे गटाने आमदार बाबाजी काळे यांना भक्कम मताधिक्य दिले होते, त्याच गटात जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र 'मशाल' कमालीची मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेची आघाडी जिल्हा परिषदेत टिकवता न आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, बाबाजी काळे या गटात बॅकफुटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
काय आहे मतं घटण्यामागचे गणित?
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सोबत असतानाही बाबाजी काळे यांनी या गटातील प्रत्येक गावातून आघाडी घेतली होती. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वपक्षातील सक्षम उमेदवार असतानाही, बाहेरील पक्षातून आलेल्या उमेदवाराला संधी दिल्याने मशालीचे 'मेरिट' घसरल्याचे बोलले जात आहे. पक्षातीलच इच्छुक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेतलेल्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेमुळे मतदानात मोठी घट झाल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
स्वीकृत नियुक्त्यांमध्ये 'निष्ठावंतांना' न्याय मिळणार का?
येत्या काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. जर या निवडीतही आमदार बाबाजी काळे यांनी पुन्हा एकदा बाहेरील नेत्यांना किंवा आयारामांना झुकते माप दिले, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष त्यांना आगामी काळात महागात पडू शकतो. सध्या तालुक्यात काळेंबद्दल अनुकूल वातावरण असले, तरी काही अनाकलनीय निर्णयामुळे हे चित्र बदलू शकते. तथापि, बाबाजी काळे हे या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीच्या यशामुळे राजकारणातील 'चाणक्य' मानले जातात, त्यामुळे ते पुन्हा तशाच चुका करतील अशी शक्यता कमीच आहे.
बाजार समितीच्या सभापती पदाकडे लक्ष..
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांची जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याने, त्यांनी आपले पद सोडण्याचा शब्द दिला आहे. आता या रिक्त होणाऱ्या सभापती पदावर आमदार काळे कोणाची वर्णी लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे इच्छुकाला संधी मिळते की पुन्हा एखाद्या नवीन नावाची वर्णी लागते, यावर तालुक्यातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील.
एकूणच, जिल्हा परिषदेच्या निकालातून मिळालेला धडा घेऊन आमदार बाबाजी काळे आगामी काळात आपली राजकीय चुणूक कशी दाखवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0