राजकीय : खेडमध्ये शिंदे शिवसेनेला 'घरभेदी' राजकारणाचा फटका; जिल्हाप्रमुख भगवान पोखरकरांची एकाकी झुंज अपयशी?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील)
चाकण :: मागील नगरपरिषद निवडणुकीत दोन नगरपरिषदांवर भगवा फडकवून तालुक्यात आपले राजकीय वजन वाढवणाऱ्या शिंदे शिवसेनेला, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र 'सपशेल' अपयशाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून पक्षासाठी खिंड लढवली, मात्र पक्षातीलच काही नेत्यांच्या छुपेपणाने केलेल्या 'तडजोडी' आणि 'अंगचोर' भूमिकेमुळे शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे. आता या पराभवानंतर नक्की कुणाचे चुकले, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
पोखरकरांची मेहनत, पण नेत्यांची 'मज्जा'!
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भगवान पोखरकर यांनी रात्रंदिवस एक करून पक्षाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने पक्षातील काही बड्या नेत्यांनी अधिकृत उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी विरोधकांशी छुपी हातमिळवणी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. "स्वतःच्या लाभासाठी पक्षात राहायचे आणि निवडणुकीच्या वेळी मात्र मित्र, नातेवाईक जपण्यासाठी पक्षनिष्ठा खुंटीला टांगायची," अशी विदारक परिस्थिती सध्या शिंदे शिवसेनेत दिसून येत आहे, ज्याचा थेट फायदा विरोधी उमेदवारांना झाला.
पिंपळगाव व नाणेकरवाडी गटात 'स्वकीयांनीच' कापले पाय?
पिंपळगाव गटात भगवान पोखरकर यांनी वारंवार सूचना देऊन आणि कान टोचूनही काही स्थानिक नेत्यांनी प्रचारात कसलाही रस दाखवला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या निवडणुकीत पुढाकार घेऊन जोमाने प्रचार करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. परिणामी, त्यांच्या घरातील उमेदवार आणि नाणेकरवाडी गटातील उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पिंपळगाव गटाची जबाबदारी सोपवूनही गोरे कुटुंबातील सदस्यांनी तिथे म्हणावे तसे काम न केल्याने पक्षाची मोठी पीछेहाट झाली आहे.
आता 'सर्जरी'ची वेळ: पोखरकर कठोर भूमिका घेणार?
पक्ष संघटना म्हणून ताकद देतो, संधी देतो; पण वैयक्तिक हेवेदाव्यांसाठी जर पक्ष आदेश धाब्यावर बसवले जात असतील, तर आता गप्प बसून चालणार नाही. भगवान पोखरकर यांनी सर्वस्व पणाला लावूनही काही पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे हा पराभव पहावा लागला. आता जिल्हाप्रमुख म्हणून पोखरकर यांना कठोर भूमिका घ्यावीच लागेल. पक्ष कामात टाळाटाळ करणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्या नेत्यांवर कडक कारवाई करून संघटनेत शिस्त आणण्याशिवाय आता दुसरा पर्याय उरलेला नाही.
What's Your Reaction?
Like
6
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
2
Wow
0