Social Activity || लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीकडे दुर्लक्ष: चाकण नगरपरिषदेचा बेजबाबदारपणा; नगरसेवक प्रेम जगताप आक्रमक!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचे महामेरू, क्रांतिवीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीचा विसर पडणे हे केवळ प्रशासकीय अनास्थेचे लक्षण नसून, थेट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आदेशाचाच अवमान आहे. आज दिनांक १८ जुलै २०२६ रोजी अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त चाकण नगरपरिषदेत शुकशुकाट असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासकीय आदेशाला 'केराची टोपली'
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक क्रमांक जपुती-२०२५/प्र.क्र.१२६/कार्या.जपुक(२६), दिनांक २९.१२.२०२५ अन्वये सन २०२६ मधील मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजऱ्या करावयाच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या आदेशानुसार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथींचे कार्यक्रम सन्मानपूर्वक साजरे करणे बंधनकारक आहे.

असे असतानाही, चाकण नगरपरिषदेने या शासन आदेशाला हरताळ फासून, आपल्या असंवेदनशीलतेचा आणि बेजबाबदारपणाचा परिचय दिला आहे. नगरपरिषदेच्या कार्यालयात लोकशाहीरांच्या प्रतिमेला साधे हार घालण्यासही जबाबदार अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना वेळ मिळाला नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.
'जाणीवपूर्वक दुजाभाव' – नगरसेवक प्रेम जगताप यांचा घणाघात
या प्रकारावर संताप व्यक्त करत नगरसेवक प्रेम शिवाजी जगताप यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. "शासनाने परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सर्व महापुरुषांना समान सन्मान देणे ही नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी असताना, अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत दाखवलेली ही अनास्था केवळ चुकीची नसून, ती जाणीवपूर्वक केलेला दुजाभाव आहे," असा खणखणीत आरोप त्यांनी केला आहे.
आंदोलनाचा इशारा..
प्रशासनाच्या या कारभाराची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्रेम जगताप यांनी केली आहे. जर प्रशासनाने आपल्या या चुकांची जबाबदारी स्वीकारून सुधारणा केली नाही, तर नगरपरिषदेच्या या गलथान कारभाराविरोधात संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
शासकीय आदेशांचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या चाकण नगरपरिषदेच्या या निष्क्रियतेवर आता नागरिकच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जबाबदार खुर्चीवर बसलेल्या लोकप्रतिनिधींचे आणि अधिकाऱ्यांचे अण्णाभाऊंच्या कार्याकडे असलेले हे दुर्लक्ष चाकणकरांच्या भावना दुखावणारे आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0