मोठी बातमी : विमाननगरमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; खिडकीतून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, मॅनेजर गंभीर जखमी..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पुणे: पुण्याच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर कारवाईच्या भीतीने खिडकीतून उडी मारणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत स्पाचा मॅनेजरही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगरमधील 'रूट्स स्पा' (Roots Spa) येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलीस स्टेशनच्या पथकाने या स्पावर छापा टाकला. पोलिसांची एन्ट्री होताच स्पामध्ये एकच गोंधळ उडाला. कारवाईच्या धास्तीने तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात एका महिलेने आणि स्पा मॅनेजरने इमारतीच्या खिडकीतून थेट खाली उडी मारली.
महिलेचा जागीच मृत्यू, मॅनेजरची प्रकृती चिंताजनक..
उडी मारल्यानंतर दोघेही सिमेंटच्या जमिनीवर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यात संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला. स्पा मॅनेजरही या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरू..
या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
•छाप्यावेळी नक्की काय घडले?
•खिडकीला सुरक्षा जाळी नव्हती का?
•हा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता?
या सर्व प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, 'रूट्स स्पा'च्या मालकाचीही चौकशी केली जाणार आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. मात्र, या कारवाईदरम्यान घडलेल्या या मृत्यूच्या घटनेने पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0