PDCC Vote || सर्वपक्षीय सलोखा अन् निष्ठेचे राजकारण! खेडमधील सहकार क्षेत्रात अरुण सोमवंशी यांचे वजन पुन्हा सिद्ध; PDCC प्रतिनिधीपदी मोहोर..!
लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी
डेहणे(ता. खेड) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. (PDCC) च्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या आगामी पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी शेंदुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. (मु. शेंदुर्ली, पो. एकलहरे, ता. खेड) च्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक श्री. अरुण बाजीराव सोमवंशी यांची एकमताने व बिनविरोध निवड झाली आहे.
शेंदुर्ली आदिवासी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ठराव क्रमांक १ (दि. १२/०९/२०२६) अन्वये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संस्थेचे मतदार, उमेदवार, सूचक किंवा अनुमोदक म्हणून अधिकार देण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
विरोध विरघळला; ‘सोमवंशी हेच आमचे प्रतिनिधी’ असा एकमुखी कौल..
शेंदुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या कोणत्याही संचालक अथवा सभासदाने अरुण सोमवंशी यांच्या नावाला काडीमात्रही विरोध दर्शवला नाही. उलटपक्षी, ‘आमच्या संस्थेकडून सोमवंशी हेच अधिकृत प्रतिनिधी म्हणून गेले पाहिजेत,’ अशी ठाम भूमिका सर्व संचालकांनी मांडत त्यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब केले. आदिवासी व दुर्गम भागातील शेतकरी आणि सभासदांनी त्यांच्यावर दाखवलेला हा अढळ विश्वास खेड तालुक्यातील राजकीय व सहकार वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
मोहिते पाटलांचे निष्ठावंत शिलेदार; चढउतारातही निष्ठा अढळ
अरुण सोमवंशी हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक मानले जातात. राजकारणात जेव्हा अनेक बडे सहकारी आणि आश्वासक शिलेदार मोहिते पाटलांची साथ सोडून गेले, अशा बिकट राजकीय परिस्थितीतही अरुण सोमवंशी ढाल बनून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राजकीय जीवनात अनेक चढउतार, स्थित्यंतरे आली, तरीही सोमवंशी यांनी कधीही तत्त्व आणि निष्ठा सोडली नाही. आज त्यांच्या याच संयमी, प्रामाणिक आणि निष्ठावंत वृत्तीचे फळ त्यांना या निवडीच्या रूपाने मिळाल्याचे बोलले जात आहे.
सर्वपक्षीय सलोखा हीच जमेची बाजू...
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार, भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी खराबवाडीचे माजी संचालक आणि खेड खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक म्हणून काम करताना सोमवंशी यांनी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी अत्यंत सलोख्याचे व आदराचे संबंध जपले आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासकामांवर भर देणारा चेहरा म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक भूमिकेचा मोठा फायदा त्यांना सहकार आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने होत आहे.
"राजकारणात स्वार्थ आणि तात्पुरती निष्ठा यापेक्षा सातत्य, संयम आणि प्रामाणिकपणा कायम टिकून राहतो, हेच शेंदुर्ली सोसायटीच्या या ठरावातून अधोरेखित झाले आहे." — स्थानिक कार्यकर्ते
दरम्यान, अरुण सोमवंशी यांची PDCC बँकेच्या मतदार प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल खेड तालुक्यातील सहकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1