Girl kidnapped || सावधान! चाकणमध्ये 'शिकारी' सक्रिय? परीक्षेला गेलेली १५ वर्षांची मुलगी बेपत्ता; पालकांनो, डोळ्यात तेल घालून जपण्याची वेळ!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण(पुणे) : औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाणारे चाकण शहर सध्या एका वेगळ्याच चिंतेच्या सावटाखाली आहे. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंतेत टाकणारे असून, नुकतीच चाकण पोलीस ठाण्यात अशाच एका घटनेची नोंद झाली आहे. आपली १५ वर्षांची मुलगी परीक्षेला जाते असे सांगून घरून निघाली, पण ती पुन्हा परतलीच नाही, या विचाराने एका पित्याचे हृदय पिळवटून जात आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वडील यांची १५ वर्षीय मुलगी ही २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास 'चाकण शहरातील नामांकित शाळेत' इयत्ता ९ वीची परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, सायंकाळ उलटली तरी ती घरी परतली नाही. नातेवाईक आणि तिच्या मैत्रिणींकडे शोध घेऊनही मुलीचा पत्ता लागला नाही. अखेर, कोणा अज्ञात इसमाने तिला कसले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.
"तुमची लेक सुरक्षित आहे का?"
चाकण परिसरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून पालकांसाठी धोक्याची घंटा आहे.
पालकांसाठी काही महत्त्वाचा संदेश:
१. संवाद वाढवा: आपली मुले कोणाशी बोलतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, याकडे लक्ष द्या. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करा जेणेकरून ते मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतील.
२. मोबाईलवर लक्ष ठेवा: सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा अशा जाळ्यात मुलींना ओढले जाते. मोबाईलचा वापर मर्यादित आणि देखरेखीखाली असावा.
३. शाळा-कॉलेजशी संपर्क: मुले वेळेवर शाळेत पोहोचली का आणि तिथून कधी निघाली, याची अधूनमधून खातरजमा करा.
४. आमिषांपासून सावध: अनोळखी व्यक्तीने दिलेले चॉकलेट, गिफ्ट किंवा लिफ्ट घेणे किती घातक ठरू शकते, याचे शिक्षण मुलांना द्या.
पोलिसांचे महत्वाचे आवाहन:
जर कोणाला अशा मुलीबद्दल काहीही माहिती मिळाल्यास किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ उत्तर चाकण पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधावा असे आव्हान उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0