Political Update || वैफल्यग्रस्त मानसिकता आणि प्रशासकीय अज्ञान; आमदार बाबाजी काळेंचा 'मोहिते-पाटलांवर' प्रहार.!
माजी आमदार दिलीप मोहिते याच्या टिकेनंतर आमदार बाबाजी काळे यांचे सोशल माध्यमातून जाहीर निवेदन..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड/चाकण : "प्रशासकीय कामाची एक निश्चित पद्धत असते, मात्र माजी आमदार दिलीप मोहिते यांना त्याचे साधे ज्ञानही उरलेले नाही. वैफल्यग्रस्त मानसिकतेतून ते केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत. खेड तालुक्यातील जनतेची गरज ओळखून दोन अपर तहसील कार्यालयांचा पाठपुरावा मीच केला असून, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे," अशा शब्दांत खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा समाचार घेतला.

आमदार काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोहिते यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
१. दोन अपर तहसील कार्यालयांचे नियोजन..
खेड तालुक्याचा वाढता विस्तार, चाकणचा औद्योगिक पट्टा आणि पश्चिम भागातील आदिवासी बांधवांची निकड लक्षात घेऊन तालुक्याला दोन अपर तहसील कार्यालयांची गरज आहे. यासाठी आमदार काळे यांनी १३ व २३ जानेवारी २०२६ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. "माझ्या आक्रमक पाठपुराव्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी चाकणबाबतचा सुधारित प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तांत्रिक बाबींची माहिती नसताना माजी आमदार केवळ प्रसिद्धीसाठी 'माकड उड्या' मारत आहेत," असा टोला काळेंनी लगावला.
२. 'उष्ट्या' भूमिपूजनाचा पर्दाफाश..
विकासकामांच्या निधीवरून बोलताना आमदार काळे म्हणाले की, ज्या रस्त्यांचे माजी आमदारांनी 'उष्टे भूमिपूजन' केले, तो निधी प्रत्यक्षात रद्द होण्याच्या मार्गावर होता. चाकण नगरपरिषदेच्या प्रशासकांनीही त्याबाबत असमर्थता दर्शवली होती. मात्र, आमदार म्हणून आपल्या अधिकारात तारांकित प्रश्न (क्र. १०२७०) उपस्थित करून तो निधी पुन्हा खेचून आणला. "हा निधी जनतेचा आहे, तुमच्या घरचा नाही," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
३. महिला लोकप्रतिनिधींचा अवमान ही 'नीच' प्रवृत्ती..
चाकणच्या नगराध्यक्षा मनिषा गोरे यांच्या शासकीय कार्यक्रमातील उपस्थितीवरून टीका करणाऱ्या मोहितेंचा काळेंनी तीव्र निषेध केला. "नगराध्यक्षा या शहराच्या प्रथम नागरिक आहेत. ज्या प्रवृत्तीने स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याच व्यक्तीने आता त्यांच्या पत्नीला सल्ले देणे हास्यास्पद आहे. स्वतःला प्रोटोकॉलचे पंडित समजणाऱ्यांना एका महिलेचा सन्मान राखण्याचे शहाणपण सुचू नये, हे दुर्दैव आहे," अशी टीका त्यांनी केली.
४. अधिकारी वर्गावर दबाव आणणे चुकीचे..
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात 'स्मार्ट शाळा' व दवाखाने होऊ लागले आहेत. हे काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसत असल्यानेच माजी आमदार आता अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. ही त्यांची खराब मानसिकतेची लक्षणे असून, त्यांनी आधी आपली पात्रता तपासावी, असा इशाराही काळेंनी दिला.
५. जनतेचे प्रश्न भाषणाने सुटत नाहीत..
अशोक खांडेभराड यांच्यावर निशाणा साधताना आमदार काळे म्हणाले की, केवळ माझ्यावर बेताल वक्तव्ये करण्यासाठी त्यांना 'रोजगार' मिळत आहे. "खेडच्या जनतेचे प्रश्न भाषणांनी सुटणार नाहीत. ज्यांना जनतेने घरी बसवले आहे, त्यांनी विकासकामात अडथळे आणणे थांबवावे. सुज्ञ जनता या वैफल्यग्रस्त विधानांना गांभीर्याने घेणार नाही," असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.

"मी केवळ निवडणुकीपुरते राजकारण करत नाही, तर खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. माजी आमदारांनी आपल्या अपुऱ्या माहितीवर बरळणे थांबवावे."
— आमदार बाबाजी काळे
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0