Woman Murdered || वृद्धेचा गळा दाबून खून; सोन्याचे दागिने लुटून मृतदेह गोणीत भरून इंद्रायणीत फेकला.!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण(पुणे): खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे सोन्याच्या दागिन्यांसाठी एका नराधमाने ८० वर्षीय वृद्धेची अमानुष हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरला आणि करंजविहीरे ते धामणे रस्त्यावर असणाऱ्या भामा नदीच्या पात्रात फेकून दिला.
नेमकी घटना काय?
मौज करंजविहीरे येथील मरगज वस्तीवर राहणाऱ्या सिंधुबाई विठोबा मरगज (वय ८० वर्षे) या २ मे २०२६ रोजी सायंकाळी ८:०० च्या सुमारास वस्तीवरील पायटा (पानंद रस्ता) जात असताना ही घटना घडली. त्याच गावातील रहिवासी असलेल्या आरोपी कैलास कुंडलिक मरगज (वय ३६ वर्षे) याने सिंधुबाई यांच्याकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबून खून केला.
नदी पात्रात मृतदेहाची विल्हेवाट..
खून केल्यानंतर आरोपीने वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. हा गुन्हा लपवण्यासाठी त्याने सिंधुबाईंचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत भरला आणि करंजविहीरे ते धामणे रस्त्यावर असणाऱ्या भामा नदीच्या पुलावरून नदी पात्रात फेकून दिला.
असा झाला खुलासा..
मयत सिंधुबाई यांचा नातू समीर बाळू मरगज (वय २७ वर्षे) यांनी या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत या प्रकरणाचा उलगडा केला.
पोलीस कारवाई..
उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी कैलास मरगज याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१), ३०९(६) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबिक नात्याला काळिमा फासणाऱ्या या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
या घटनेचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक हे करत आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0