Ambedkar Jayanti || डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमावली जाहीर; शांतता समितीच्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
महाळुंगे इंगळे(चाकण) : आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुरुवारी (दि. ०९ एप्रिल) रात्री ८ ते ९ या वेळेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जयंती साजरी करणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य आणि पोलीस पाटील उपस्थित होते.
उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशनच्या वतीने खालील महत्त्वपूर्ण सूचना आणि नियमावली लागू करण्यात आली आहे:

१. सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य
जयंतीच्या निमित्ताने केवळ मिरवणुकांवर खर्च न करता, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यावर भर द्यावा. तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्यानमाला, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
२. डी.जे. वर बंदी आणि ध्वनी प्रदूषण नियम..
मिरवणुकीदरम्यान कोणत्याही मंडळाला डी.जे. सिस्टीम वापरता येणार नाही. शासनाने ध्वनी प्रदूषणाबाबत घालून दिलेल्या सर्व अटींचे तंतोतंत पालन करावे लागेल. तसेच, मिरवणूक किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आक्षेपार्ह गाणी किंवा चिथावणीखोर घोषणाबाजी होणार नाही याची दक्षता मंडळांनी घेणे अनिवार्य आहे.
३. निवडणूक आचारसंहिता आणि प्रशासकीय नियम
• आचारसंहिता: सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक आचारसंहितेच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.
• वेळेचे बंधन: सर्व कार्यक्रम सकाळी ६:०० ते रात्री १०:०० या वेळेतच पूर्ण करावे लागतील.
• परवानगी व सीसीटीव्ही: कार्यक्रमाच्या जागेसाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे आणि कार्यक्रम स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे.
• मिरवणूक मार्ग: मिरवणूक केवळ पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गानेच न्यावी, ऐनवेळी मार्गात बदल करण्यास सक्त मनाई आहे.

४. वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था:
मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंडळांनी जास्तीत जास्त स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता आणि बंधुतेच्या संदेशाचे पालन करून भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करावे, असे आवाहन दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0